

पैठण / अंबड : पुढारी वृत्तसेवा
अंबड येथील एसटी आगारातील चालक शंकर जालिंदर झिने (वय 28) याने पैठण तालुक्यातील चांगतपुरी फाट्याजवळ आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (दि. ३) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी जीवनयात्रा संपविल्याचा आरोप राज्य परिवहन कास्ट्राईब संघटनेने केला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, झिने याने रात्री पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर पवार, बीट जमादार संजय आटोळे घटनास्थळी दाखल झाले. झिने यांना पैठण येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुरुवारी सकाळी उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
याबाबत कास्ट्राईब संघटनेचे अंबड आगाराचे सचिव सचिन हराळे म्हणाले, की झिने हे 2020 पासून अंबड आगारात रोजंदारी तत्त्वावर कामावर होते. मात्र, नियमाप्रमाणे सेवा करूनही ते कायम झाले नव्हते. परिणामी त्यांना कमी पगार आणि महामंडळाच्या सवलती मिळत नव्हत्या. या महिन्यात तर त्यांना वेतन, बोनसपोटी केवळ सात हजार रुपयेच मिळाले होते. परिणामी त्यांनी आत्महत्या केली, असे संघटनेचे म्हणणे आहे.