जालना : आता कसली आली दिवाळी? शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला

जालना : आता कसली आली दिवाळी? शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला
Published on
Updated on

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : आता तरी थांब ना रे पावसा, सोयाबीनला कोंब फुटले, पांढऱ्या सोनेही विरघळले, सोयाबीन व कापसाच्या जीवावर करणार होतो दिवाळी मात्र, आता या परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कापसाच शेत आलं पाण्याखाली, आता कसली आली दिवाळी असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अंबड तालुक्यात वडीगोद्री व धनगर पिंप्री मंडळात यावर्षी सरासरीच्या दीड ते दुप्पट पाऊस झाला आहे. गेल्या एका महिन्यात पावसाचा खंड आणि त्यानंतर महिनाभरापासून सुरू असलेला पाऊस यामुळे खरीप हंगाम पुरता नष्ट झाला आहे.

खरीप हंगामात मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी बी- बियाणे उसनवारी करून आणि उधारीवर घेतले. पेरणी व लागवड करून मेहनत घेतली. याच दरम्यान गेल्या महिन्यात पावसाचा खंड पडला. त्यातही कसे बसे पाणी देऊन पिके जगवली. यानंतर पावसाची संततधार सुरू झाली आणि पिकांना फटका बसला. त्यातही रोगराई पसरली. औषध फवारणी करून पिके जगवली. पुन्हा वादळी वाऱ्याने कहर केला आणि एकाच रात्रीत सर्व पिके जमीन दोस्त झाली. यावरही मात करत शेतकरी उभा राहिला. मात्र, या परतीच्या पावसाने तर होत्याच नव्हतं करून टाकले.

आता बी- बियाणे खते औषध यासाठी घेतलेली उसनवारी व दुकानदार यांची उधारी कशी फेडायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. डोंगराएवढं संकट या जगाच्या पोशिंद्यावर आलं आहे. मात्र, शासन- प्रशासन, राजकारण करण्यात व एकमेकांवर चिखल फेक करण्यात गुंग झालं आहे. जालन्याचे पालकमंत्री यांनी सजवलेल्या गाडीत अंबड तालुक्यात येऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, प्रशासन पंचनामे न करता पाहणी करत असून फक्त कागदी घोडे नाचवत आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता दिवाळी अगोदर सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

या परतीच्या पावसाने खरिपाबरोबर फळबागांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर तोडणीस आलेला ऊस ही पाण्यात असल्याने ऊस तोडणार कसा? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे आता कारखान्याचे गाळप ही लांबणीवर जाणार आहे. वडीगोद्री व धनगर पिंप्री मंडळात यावर्षी सरासरीच्या दीड ते दोन पट पाऊस झाला आहे.

अंबड तालुक्यातील मंडळाप्रमाणे १८ ऑक्टोबर अखेर पावसाची आकडेवारी

वडीगोद्री मंडळ ११९६ मिमी, धनगर पिंप्री १३७६, गोंदी मंडळ ८७० मिमी, अंबड मंडळ ९८० मिमी, सुखापुरी ९३६ मिमी, रोहिलागड ८२६ मिमी, जामखेड ७०९ मिमी, अशी आकडेवारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news