परभणी : जैन लेणी समूह शिल्प संपदेचा एक अमुल्य ठेवा असलेले जिंतूर शहराजवळील श्री दिगंबर जैन अतिशय नेमगिरी हे जैन धर्मिय तिर्थक्षेत्र पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. राज्यातीलच नव्हे तर राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यांतून पर्यटक येतातच. शिवाय परदेशातील पर्यटकांची देखील नेहमीच रेलचेल असते. हे क्षेत्र जैन लेणी समूह आणि तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जैन शिल्प संपदेचा हा एक अमूल्य ठेवा आहे.
हा प्राचीन वारसा अजिंठ्याच्या डोंगर रांगातील शाखेवर नेमगिरी आणि चंद्रगिरी टेकडीवर आहे. येथील लेणीच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस पद्मावतीची अतिशय सुंदर साळंकृत मूर्ती आणि डाव्या बाजूस धरणेंद्र यक्षाची मूर्ती आहे. पर्यटकांबरोबरच पंचक्रोशीतल्या शाळांच्या सहली येथे नित्यनियमाने येत असतात.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या पर्यटनस्थळाला एकदातरी नक्कीच भेट द्यायला हवी. नेमगिरीतील मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे हे मंदिर पूर्णतः जमिनीमध्ये दबलेले होते. सुमारे ९ हजार किलो वजनाची श्री १००८ भगवान पाश्वनाथ यांची मूर्ती आहे. जी जमिनीपासून ४ इंच वर केवळ एका सुपारी एवढ्या दगडावर विराजमान असून हे एक आश्चर्य आहे.
मंदिरात ७ गुफा असून पहिल्या गुफेमध्ये महावीर स्वामींची साडेतीन फुट उंचीची मूर्ती आहे. या गुफेमध्ये आचार्य भद्रबाहु, आचार्य शांतीसागर यांचे पदकमळ हे या गुफेचे वैशिष्टय आहे. गुफा क्र.२ मध्ये १००८ आधिनाथ स्वामींची महान प्रतिमा आहे. गुफा नं. ३ मध्ये श्री १००८ शांतीनाथ स्वामी यांच्या पद्मासनामध्ये विराजमान मुर्ती ६ फूट उंचीची आहे.
गुफा क्र.४ मध्ये मूलनायक श्री १००८ नेमीनाथ स्वामींची भव्य असलेली मूर्ती पाहता क्षणी मोहून टाकते. ही मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. गुफा नं. ५ मध्ये श्री १००८ अंतरिक्ष पार्श्वनाथ स्वामींची पद्मासनातील मूर्ती आहे. ६ व्या गुफेमध्ये साडेचारफूट उंचीची आणि एखाद्या स्तंभासारखी दिसणारी नंदेश्वराची मूर्ती आहे. तर सातव्या गुफेमध्ये भगवान बाहुबलींची विशाल मूर्ती आहे. तपश्चर्येत मग्न अशी ही मूर्ती असून मानेपर्यंत आलेली वेल, खांद्यावर नागांचे वास्तव्य आणि मांडीमध्ये भुंग्याने केलेले छिद्र यावरून या मूर्तीची तपर्धेतील मग्नता दिसून येते.
श्री. क्षेत्र नेमगिरी येथे राहण्यासाठी भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली असून प्रसादालय आणि भोजनाची देखील उत्तम व्यवस्था आहे. परभणीपासून येथे पोचण्यासाठी ४५ कि.मी. चे रस्ते अंतर आहे. जिंतूरपासून अवघ्या ४ कि. मी. वर हे स्थळ आहे. तर जवळचे विमानतळ म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळ १६५ कि. मी. अंतरावर आहे.