

Work on railway flyover in Purne completed, but inauguration awaited
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झाले, तरी तो अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत अडकून पडला. परिणामी, साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असूनही ऊस वाहतूक ठप्प झाली. शेतकरी व स्थानिक नागरिक यामुळे संतापले असून त्यांनी पूल त्वरित वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे.
पूर्णा-अकोला व पूर्णा-नांदेड या दोन्ही महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या लोहमार्गावर हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत महारेल बांधकाम विभागाने या पुलाचे काम हाती घेतले होते. कामाचा काही भाग गॅलकोन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने पूर्ण केला, तर उर्वरित काम हे आर.एस. व्ही. कन्स्ट्रक्शन कंपनीने पूर्ण केले. दीर्घ काळानंतर आता हा पूल पूर्ण झाला असून सर्व तांत्रिक बाबीही जवळपास पूर्णत्वास आल्या आहेत.
पुलाचे बांधकाम सुरू झाल्यापासूनच जुना रस्ता बंद करून शेजारील पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र हे रस्ते अत्यंत अरुंद व खड्डेमय असल्यामुळे ट्रक, ट्रॅक्टर, ऊस गाड्या तसेच इतर जड वाहनांची वाहतूक धोकादायक ठरत आहे. परिणामी, साखर कारखान्यांकडे ऊस पोहचविण्याचे काम ठप्प झाले असून गाळप प्रक्रियेत अडथळे येत आहेत. संबंधित विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, पुला शेजारील पर्यायी रस्त्यांचे मजबुतीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच पूल हस्तांतरणाची काही प्रशासकीय प्रक्रिया शिल्लक असल्याने उदघाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला गेला. तथापि, महारेल बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अधिकारी या बाबतीत प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.
पूर्णा तालुक्यात सध्या गळीत हंगामाचा काळ असून ऊस वाहतूक ठप्प राहिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. ऊस वेळेत साखर कारखान्यापर्यंत न पोहचल्यास त्याची गुणवत्ता घटते आणि दर कमी मिळतो. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी उघडण्याचा निर्णय विलंबाने घेतल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन वर्षे आम्ही या पुलाकडे डोळे लावून बसलो. आता काम पूर्ण झाले, तरी उदघाटनाच्या नावाखाली वाहतूक बंद ठेवली. ऊस वाहतूक अडल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे, असे एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने सांगितले आहे.
शेतकऱ्यांतून संताप
पूर्णा, सुहागन, आव्हई, पांगरा, बरबडी, आडगाव, माटेगाव, कौडगाव, पिंपळगाव, नावकी, सुरवाडी, आहेरवाडी, कात्नेश्वर, एरंडेश्वर आदी गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली की, पुलाचे उद्घाटन तातडीने करून वाहतूक सुरळीत करावी. अन्यथा ऊस वाहतुकीमुळे होणारे नुकसान भरून निघणे अशक्य होईल असे कळविले आहे.