

पूर्णा : भरधाव टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याकडेच्या मोठ्या खड्यात टेम्पो उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.५) दुपारी ४.३० ते ५ च्या दरम्यान झिरोफाटा-पूर्णा या मुख्य रोडवर असलेल्या कात्नेश्वर शिवारात घडली. मोहम्मद आर एन (वय २२, मुळ गाव बिहार, सध्या, समृध्दी महामार्ग रोड लक्ष्मीनगर साईट पूर्णा) असे मृत मजूराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, परप्रांतीय मजूर लोखंडी प्लेट्स आणि पोल घेऊन बांधकाम साईटवरील कामाच्या ठिकाणी टेम्पोतून निघाले होते. हा भरधाव टेम्पो झिरोफाटा- पूर्णा रोडवर आला असता खड्डा चुकवताना टेम्पो चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटले. व एका मोठ्या खड्यात जाऊन टेम्पो उलटला. या टेम्पोच्या मागे बसलेल्या परप्रांतीय मजूराच्या अंगावर टेम्पोतील लोखंडी साहित्य पडल्याने तो जागीच ठार झाला. तर तिघे गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला . त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. परभणी येथील शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.