

Waste-picking women in Eat and the surrounding area story
समाधान डोके
ईट : नवरात्रात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. महिला नटूनथटून देवीची आराधना करतात; - मात्र ईट आणि परिसरातील कचरावेचक महिलांच्या आयुष्यात नवरात्र असो वा अन्य दिवस, परिस्थिती - मात्र सारखीच असते. डोक्यावर प्लॅस्टिकची गोणी, हातात लोखंडी सळी आणि नजरेसमोर कचऱ्यातून मिळणाऱ्या चार पैशांची आशा, अशा स्थितीत या - महिला दिवसभर भटकंती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. संकटांशी झुंज देत संसाराचा गाडा ओढणाऱ्या या महिलाच खऱ्या अर्थाने दुर्गेचे रूप ठरतात.
आजारी पडल्यास घराची चूल कशी पेटवायची, - मुलाबाळांना खाऊ काय घालायचे, असे प्रश्न या महिलांना सतत सतावत असतात. त्यामुळे आजारपणातही घरी थांबणे त्यांना परवडत नाही. रोज - नव्या आशेने सकाळी घराबाहेर पडायचे आणि संध्याकाळी मिळालेल्या भंगाराच्या पैशांतून संसाराचा खर्च भागवायचा, हाच त्यांचा दिनक्रम बनला आहे. या
कामाला ना ठरावीक वेळ, ना साप्ताहिक सुट्टी. ईटसह परिसरातील गावांमध्ये दररोज १० ते १५ महिला कचरा वेचण्याचे काम करतात. रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत तसेच कचराकुंड्यांमध्ये टाकलेल्या कचऱ्यातून त्या पुनर्वापरयोग्य वस्तू गोळा करतात. पुढे, प्लॅस्टिक, काचेच्या वस्तू आणि थंडपेयांच्या रिकाम्या बाटल्या असे साहित्य भंगार विक्रेत्याला विकून मिळणाऱ्या पैशांतून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
प्लॅस्टिकची गोणी घेऊन घराबाहेर पडलेल्या या महिला कचऱ्यात लोखंडी सळी किंवा खुरप्याच्या साह्याने शोध घेतात. दुर्गंधी, माश्या, कुजलेला कचरा आणि अस्वच्छतेची पर्वा न करता त्यांचे काम सुरू असते. दुपारी एखाद्या झाडाखाली विसावा घेत शिदोरीतील भाकरी खायची आणि पुन्हा कचऱ्यात उपजीविकेचा शोध घ्यायचा, असा त्यांचा दिनक्रम असतो.
दिवसभराच्या मेहनतीनंतर गोळा केलेले साहित्य विकून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांतून घरखर्च, मुलांचे संगोपन आणि इतर गरजा भागवाव्या लागतात. समाजाच्या नजरेत दुर्लक्षित असलेल्या या महिलांच्या कष्टांवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. नवरात्रात शक्तीची पूजा होत असताना प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत कुटुंबाला आधार देणाऱ्या या कष्टकरी महिलांच्या जगण्याकडेही समाजाने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे.