

Parbhani Farmers Crop Insurance
जिंतूर: जिंतूर-सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पिक विमा व चालू वर्षात आर्थिक मदत द्या, अशी मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
जिंतूर व सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यामध्ये मागील सन २०२४ या वर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. परंतु, अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी शेतकरी व शासन यांनी एकत्रित पीकविमा कंपनीस भरलेला होता. परंतु, मागील ८-१० दिवसापूर्वी काही मोजक्याच शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला आहे, त्यामुळे ९७ टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत.
त्यासाठी उर्वरित सर्व शेतकऱ्यांना देखील सरसकट पिकविमा तात्काळ देण्यासाठी आपल्या स्तरावरून पीकविमा कंपनीला आपले आदेशित करावे. तसेच चालू वर्षी सन २०२५ मध्ये आज रोजी प्रंचंड अतिवृष्टी झाली आहे. जिंतूर-सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचमाने न करता सरसकट शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी चंद्रकांत गाडेकर, विशाल पाटील, योगेश देशमुख, विठ्ठल देशमुख आदी उपस्थित होते.