

Vanchit Bahujan Aaghadi Protest Purna
पूर्णा : येथील नगरपरिषद प्रशासनाने नवीन नियमानुसार मालमत्ता घरपट्टी व इतर करवाढ केली आहे. या जाचक आणि न परवडणा-या करवाढीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि. ३०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात स्वाक्षरी मोहीम राबवली.
या आधी वंचित बहुजन आघाडी व इतर सामाजिक संघटनांनी पालिका करवाढ विरोधात मोर्चा व विविध आंदोलने केली होती. परंतु, ही करवाढ मागे घेण्यात आलेली नाही. या करवाढीमुळे नागरिकांना मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे करवाढ रद्द करण्यासाठी शहरवासीयांकडून आंदोलन, मोर्चे काढून निवेदन देण्यात आले आहे. तरीही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे.
आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवून शासनाचे लक्ष वेधले आहे. या मोहीमेत असंख्य महिला पुरुष नागरिकांनी सहभाग नोंदवून स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी वंचितचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, महिला नेत्या अर्चना पंडित, तालुकाध्यक्ष सीताराम रेनगडे, कुंदण ठाकूर, अजय काळे, राहुल कचरे, राजू गायकवाड, आनंद गायकवाड, शादूत पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.