Purna Protest | रुंजफाट्यावर 'वंचित'चा एल्गार; अवैध धंदे, रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी वाहतूक रोखली
Vanchit Bahujan Aghadi Runjfata Road Blockade
पूर्णा: तालुक्यातील फोफावलेले अवैध धंदे, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष याविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात आज रुंजफाटा येथे विविध मागण्यांसाठी 'रास्तारोको' आंदोलन करण्यात आले. तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
पूर्णा तालुक्यातील कावलगाव सर्कल भागातील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन पुकारले होते. शुक्रवारी (दि. ८ ) दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या या आंदोलनात युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपला संताप व्यक्त केला. आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
तालुक्यातील अवैध देशी-विदेशी दारू विक्री, मटका आणि गुटखा विक्री तात्काळ बंद करावी. कावलगाव सर्कलमधील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. जिल्हा परिषद शाळांचे ऑडिट करून विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, खेळाचे मैदान आणि शालेय साहित्य यांसारख्या मूलभूत सुविधा द्याव्यात. प्रधानमंत्री आणि रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, तालुक्यातील अवैध मुरुम आणि रेती उपसा थांबवून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, गोविंद भेणे, युसुफ कलीम यांनी केले. विशेष म्हणजे, या आंदोलनाला भाजप महिला आघाडीच्या प्रभाताई सावंत आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवहार सोनटक्के यांनीही पाठिंबा दिल्याने त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते.
आंदोलनाच्या अखेरीस, नायब तहसीलदार प्रशांत थारकर आणि सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. मागण्यांवर लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

