

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा येथील रेल्वे पुलावर ४७ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रविवारी (दि.२७) सकाळी आढळून आला. मृतदेहाची छिन्नविछिन्न अवस्था झाली होती. या व्यक्तीचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Parbhani News)
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा शहरातील रेल्वे ब्रीजवर खंबा क्रमांक (३१७/२५/२७) नजीक एका ४७ वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह पटरीच्या मध्ये आढळून आला. घटनास्थळी लोहमार्ग पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. पण ओळख पटली नाही. या घटनेची नोंद लोहमार्ग पोलिस ठाण्यात झाली आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर जीन्स पँट, काळा पांढरा शर्ट आहे. ५ फूट २ इंच उंची, बांधा सडपातळ असे त्याचे वर्णन आहे. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय परभणी येथील शीतगृहात ठेवण्यात आला आहे. पुढील तपास रेल्वे लोहमार्ग पोलीस करत आहेत.