

Parbhani Purna Municipal Staff Bribery Case
पूर्णा : घराचे नामांतर करण्यासाठी १० हजारांची लाच घेताना नगर परिषद कार्यालयातील कर्मचारी नरहरी सातपुते आणि कंत्राटी कर्मचारी रत्नदिप वाघमारे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई आज (दि. १३) दुपारी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा शहरातील भीमनगर भागातील रहिवासी असलेल्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराकडे घराचे नामांतर करण्यासाठी १० हजारांची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांनी परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज उपाअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बसवेश्वर जगीकोरे, अंमलदार जिबराईल शेख, अतुल कदम, श्याम बोधनकर, चालक नरवाडे यांच्या पथकाने सापळा रचला. यावेळी लाचेची रक्कम घेताना पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी नरहरी सातपुते आणि कंत्राटी कर्मचारी रत्नदिप वाघमारे या दोघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परभणी लाचलुचपत विभागाचे अधिकारी करीत आहेत.