Parbhani Accident : मानवत-परभणी महामार्गावर ट्रक-स्‍कॉर्पिओची धडक

खड्डे चुकविताना अपघात घडल्‍याची माहिती; मानवतच्‍या बांगड प्‍लॉटमधील पाच युवक जखमी
Parbhani Accident
Parbhani Accidentpudhari photo
Published on
Updated on

मानवत : मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रस्त्याची दुरवस्था वाहनचालकांच्या जीवावर उठली असून, या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी (दि.७) रात्री साडेआठच्या सुमारास तालुक्यातील किन्होळा-खरवडे शिवारात ट्रक आणि स्कॉर्पिओची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात स्कॉर्पिओमधील मानवत शहरातील बांगड प्लॉट परिसरातील पाच युवक जखमी झाले. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने परभणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातात वसीम कुरेशी, आक्रम कुरेशी, महेबूब मन्सुरी, अदनान शेख आणि महेफुस सय्यद हे पाच युवक जखमी झाले आहेत. सर्वजण मानवत शहरातील बांगड प्लॉट परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. पाचही युवक शुक्रवारी कामानिमित्त परभणी येथे गेले होते. दिवसभरातील काम आटोपून रात्री ते स्कॉर्पिओ एमएच 23 बीएच 4747 मधून मानवतकडे परतत होते. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचे वाहन किन्होळा-खरवडे शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर आले.

Parbhani Accident
Nanded Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय; नांदेडमध्ये पोलिसांची धडक कारवाई

याच वेळी मानवतकडून परभणीच्या दिशेने जाणारा ट्रक एमएच 38 एक्स 5369 समोरून येत होता. दोन्ही वाहने समोरासमोर आल्यानंतर अचानक जोरदार धडक झाली. धडकेनंतर स्कॉर्पिओचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर वाहनातील पाचही युवकांना दुखापत झाली. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्कॉर्पिओमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मदत केली. त्यानंतर जखमी युवकांना तातडीने परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संबंधित यंत्रणेने वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या. मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत.

Parbhani Accident
Nanded DCC Bank | नांदेड जिल्हा सहकारी बँक : दोन्ही पदांचे उमेदवार; खा. चव्हाणच ठरविणार!

विशेषतः रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना अचानक वाहने वळवावी लागत आहेत. त्यातून समोरून येणार्‍या वाहनांशी धडक होण्याचा धोका वाढला आहे. शुक्रवारी रात्री किन्होळा-खरवडे शिवारातील अपघातही रस्त्यावरील खड्डे चुकविताना झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण संबंधित तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी

मानवत-परभणी हा महत्त्वाचा मार्ग असून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याची अवस्था खराब झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे, रस्त्यावरील असमतोल पृष्ठभाग आणि रात्रीला अपुरा प्रकाशामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला. महामार्गाच्या दुरवस्थेबाबत वाहनचालक व नागरिकांकडून वारंवार आवाज उठविला जात असतानाही ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी आहे. आणखी एखादा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता संबंधित यंत्रणेने तातडीने महामार्गावरील खड्डे बुजवावेत, रस्त्याची पाहणी करावी आणि धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news