

Thousands of devotees gather at Daithana for the return procession
दैठणा, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनंतरची कामिका एकादशी अर्थातच परतवारीनिमित्त दैठण्यात हजारो भक्तांची मांदियाळी उसळली. जवळपास ५० हजाराहून अधिक भाविकांनी श्री संत ठाकूर बुवा, संत धीरजगीर महाराज व ग्रामदैवत महारुद्र दैवतेचे मनोभावे दर्शन घेतले. दैठणा येथे रविवारी (दि. ९) मध्यरात्री २.३० वाजता ग्रामस्थांच्या वतीने महापूजा करण्यात आली.
तद नंतर पहाटे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते महापूजा करण्यात येऊन मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. परत वारी निमित्त संत ठाकूरबुवा मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटे पाच वाजल्यापासून परभणी जिल्ह्यातील भाविकासह मराठवाडा व महाराष्ट्रातील जवळपास ५० हजार अधिक भाविकांनी संत ठाकूर बुवांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
परतवारी निमित्त माळसोन्ना, धोंडी, पोहंडूळ, आंबेटाकळी, सुनेगाव, सायला, पोरवड, सूर पिंपरी, इंदेवाडी, रूमना, जवळा, दुसलगाव, जांब, खळी, धसाडी, मुळी, बोरखंड, गंगाखेड, पोखरणी नरसिंह, नरसापुर, महातपुरी, परभणी येथील पायी दिंड्या येथे आल्या. होत्या. दिंड्या मधील विणेकऱ्यांचा ठाकूरबा संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
वारीला साडेतीनशे वर्षांची परंपरा
संत ठाकूर ठाकूर बुवा यांना मराठवाड्यातून पंढरपूर कडे पायी वारीची परंपरा सुरू करण्याचे अन्यन्यसाधारण महत्त्व जाते. संत ठाकूर बुवा यांनी तत्कालीन परिस्थितीत पायीवारी सुरू करत व्यसनमुक्त्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, अनिष्ट प्रथा विरूध्द आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आवाज उठवला. वारकरी संप्रदायातील चार प्रमुख फडांपैकी ठाकूरबुवांचा फड अत्यंत मानाचा आणि प्रभावी मानला जातो. ज्ञानेश्वर माऊली व तुकोबांच्या पालखी सोहळ्यात कीर्तनाचा व सेवेचा सर्वोच्च मान ठाकूर बुवा फडाला लाभलेला आहे. एकंदरीत दैठण्याच्या पस्त वारीला साडेतीनशे वर्षाची परंपरा लाभली असून दिवसेंदिवस भक्तांची मांदियाळी वाढतच चालली आहे
लोकप्रतिनिधींची उपस्थिती
दैठणा येथील परत वारीसाठी भाविक भक्तांसह लोकप्रतिनिधीही मोठ्या संख्येने येत असतात. याप्रसंगी खा. संजय जाधव, आ. राजेश विटेकर, आ. डॉ. राहुल पाटील, जि.प. सदस्य संग्राम जामकर, गणेश घाटगे, जि.प. चे माजी उपाध्यक्ष रामभाऊ घाटगे, जिल्हा बँकेच्या संचालक प्रेरणा वरपूडकर यांनी संत ठाकूर बुवा यांच्या समाधीचे दर्शन घेतले.