The threads of the MD drug case in Manawat to Latur, Beed, Dharashiv
मानवत, पुढारी वृत्तसेवा : मानवत-पाथरी राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापूर शिवारात शासनाने प्रतिबंधित केलेला एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ सापडल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि मानवत पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांपर्यंत पोहोचले असून, शनिवारी (ता. ८) सहा जणांना अटक करण्यात आली. यामध्ये कळंब येथील एका नगरसेवकाचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता आठ झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवत तालुक्यातील रत्नापूर शिवारात मारुती मंदिरासमोर परभणी स्थानिक गुन्हे शाखा आणि मानवत पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली होती. या कारवाईत पाथरी येथील अलीम शेख खाजा (वय ३२) आणि आंबेजोगाई येथील शाहरुख फिरोज खान पठाण (वय २९) या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.
त्यांच्याकडून ५२.३८ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ आणि एक स्कूटर जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या एमडीची अंदाजे किंमत १४ लाख ६४ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला. परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे गजेंद्र सरोदे, मानवतचे प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार करण्यात आली.
अटकेतील आरोपींकडून प्राप्त मातीनुसार या पथकांनी लातूर, परळी आणि कळंब येथे तपास सुरू केला. या तपासादरम्यान शनिवारी सहा जणांना अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून या अंमली पदार्थाच्या पुरवठा साखळीचा पुढील तपास सुरू आहे.
यांना केली अटक
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोसीन सलीम मिर्झा (३८, रा. मोमीन गल्ली, कळंब, जि. धाराशिव), अकीब अक्रम मोमीन (वय ३०, रा. बोधनगर, लातूर), बाबा मोमीन रफिक (वय ३२, रा. लातूर), सय्यद समीर सय्यद शब्बीर (रा. भोईगल्ली, परळी वैजनाथ), शेख सलमान शेख खय्युम (रा. काकर मोहल्ला, परळी वैजनाथ) आणि अयान नासेर पठाण (रा. बरकतनगर, परळी वैजनाथ) यांचा समावेश आहे.