मानवत; पुढारी वृत्तसेवा : शनिवारी (दि.10) मानवत शहरातील एका पेट्रोलपंपाजवळ चारचाकी वाहनामध्ये आढळून आलेल्या कपाशी बियाणांप्रकरणी चार आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृषी विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.९) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या मदतीने हे वाहन पकडून तपासणी करण्यात आली होती. यावेळी सुमारे ८ लाख ६४ हजार ६१५ रुपयांचा बनावट बियाणांचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणात मानवत पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक किरण दत्तराव सरकटे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून संशयीत बियाणांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री केली म्हणून या बियाणांचे उत्पादक, साठवणुकदार, विक्रेते शिवम बायो क्रॉप साइंसचे सीओ सरोज तिवारी (एन.एच. ९३१, अमेठी, उत्तर प्रदेश) व वाहतुकदार लामेश भगवान पाटील, तुषार रविंद्र पाटील, मोहीत चंद्रकांत इंगळे (तिघे रा. मध्य प्रदेश) यांच्याविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या बनावट बियाणांच्या पाकीटाचे दोन नमुने तपासणीसाठी काढण्यात आले आहेत. उर्वरित सर्व मुद्देमाल व आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.९) सकाळी ११.४५ वा. जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी यांनी दिलेल्या संदेशानुसार मानवत शहरातील कत्रुवार पेट्रोलपंपाजवळ चारचाकी वाहनामध्ये संशयीत कपाशी बियाणे असल्याची माहिती दिली. त्यानुसार कृषी अधिकारी किरण सरकटे हे तातडीने पोलीस उपनिरीक्षक अशोक ताटे, पोह नारायण सोळंके यांना सोबत घेवून घटनास्थळी पोहचले. तेथे चौधरी कृषी केंद्राचे संचालक व्यकंटेश चौधरी, मोहीम अधिकारी डी.टी.सामाले, जिल्हा कृषी अधिकारी एस.पी. मलसेटवर हे देखील हजर होते. त्या सर्वांनी एकत्रीतपणे संशयित तवेरा वाहन (क्र. एम.पी.09 बी.सी. 8872) ची तपासणी केली असता सीता बियाणे आढळून आले. त्यानंतर ते वाहन मानवत पोलीस ठाण्यात नेण्यात आले व तपासणी केली.
शनिवारी (दि. १०) दुपारी १२ वाजताच्या सुमारास तुलसी सिड्स प्राइवेट लिमीटेड कंपनीचे मार्केटींग ऑफीसर संजय खिल्लारे (परभणी) व मार्केटींग ऑफीसर जीवन सरडे (जालना) यांनी मानवत पोलीस ठाण्यास याप्रकरणी भेट दिली. भेट देवून संशयित मुद्देमालाची पाहणी केली. त्यानंतर हे बियाणे कंपनीद्वारे उत्पादित झालेले नसून बनावट असल्याबाबतची माहिती दिली.
यावरुन संबंधित पुरवठादारांनी संशयित बनावट बियाणे विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी संशयीत आरोपींनी कलम ४६३, ४६५, ४६८, ३४ भादंवि सहकलम बियाणे नियम १९६८ चे कलम ७,८,९,१० व बीज अधिनियम कलम ७ (सी) २१, अत्यावश्यक अधिनियम १९५५ कलम ३७ याचा भंग केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चार आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.