

जिंतूर : शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधित पानमसाल्याची चोरटी वाहतूक करून विक्री करण्याच्या प्रयत्नावर जिंतूर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. दादा शरीफ चौक परिसरात केलेल्या या कारवाईत ६४ हजार ८०० रुपये किमतीचा गुटखा, १ लाख १ हजार २५० रुपयांचा सुगंधित पानमसाला आणि ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो असा तब्बल ७ लाख ६६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी मुख्य आरोपी सय्यद वसीम सय्यद मोसिन याच्यासह एकूण नऊ आरोपींविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदे, प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री तसेच त्यांची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिंतूर पोलिसांना प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने रविवारी (दि.९) मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास दादा शरीफ चौकातील सार्वजनिक रस्त्यावर कारवाई केली. पोलिसांनी संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा व सुगंधित पानमसाला आढळून आला. तपासणी दरम्यान ६४,८०० रुपये किमतीचा गुटखा आणि १,०१,२५० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला जप्त करण्यात आला.
प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा कंपनीची बोलेरो एमएच २९ बीसी ३२५६ देखील ताब्यात घेतली. वाहनाची किंमत सहा लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईमुळे जिंतूर शहर व परिसरात प्रतिबंधित गुटख्याची चोरटी विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याची विक्री व वाहतूक करण्यासाठी मोठ्या वाहनांचा वापर केला जात असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद वसीम सय्यद मोसिन (रा. जमदार गल्ली, जिंतूर) याने स्वतःच्या तसेच इतर आरोपींच्या आर्थिक फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तत्सम अन्नपदार्थ अवैधरित्या बाळगल्याचे आणि त्यांची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सय्यद वसीम सय्यद मोसिन याच्यासह एकूण नऊ आरोपींचा समावेश आहे.
गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थ मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानले जातात. या पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासह विविध गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे शासनाने अशा पदार्थांच्या विक्री, साठवणूक आणि वाहतुकीवर बंदी घातली आहे. असे असतानाही नफ्यासाठी प्रतिबंधित पदार्थांची चोरटी विक्री केली जात असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जिंतूर पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटख्याची साखळी नेमकी कुठून सुरू होते, मालाचा पुरवठा कोण करतो आणि त्याची विक्री कोणत्या भागात केली जाते, याबाबतच्या तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
त्यामुळे पोलिसांच्या पुढील तपासात या रॅकेटमधील आणखी नावे समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक सवंडकर, अंमलदार सिद्धेश्वर चाटे, नामदेव डूबे, अनिल राठोड, महेश कवठाळे, सूर्यकांत सातपुते, राम पोळ, चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यातील अवैध धंदे आणि प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांकडून यापुढेही सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.