

Poorna Koliawada youth killed
पूर्णा : शहरातील कोळीवाडा गल्ली येथे किरकोळ वादातून तिघांनी संगनमत करुन एकाला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर डोके जोराने आदळून खून केला. ही घटना गुरूवारी (दि.१०) रात्री घडली. शेख सलमान शेख गुलाब (वय २७, रा. कोळीवाडा, पूर्णा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात इम्रान गुलाब शेख यांच्या फिर्यादीवरून तिघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटने विषयी अधिक माहिती अशी की, पूर्णा शहरातील कोळीवाडा येथील रहिवासी शेख सलमान शेख गुलाब येथीलच रहिवासी असलेले आरोपी गणेश जाधव, सुरज जाधव, शंकर पांढरे यांच्यामध्ये गुरूवारी रात्री काही किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादाचे पर्यवसान गंभीर मारहाणीत झाले. तिघांनी शेख सलमान यास खंडोबा मंदिरासमोरील सवारी अलाव्याजवळ शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर डोके सवारी आलाव्यास जोराने आदळवून गंभीर जखमी केले. यात त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कोळीवाडा येथील तिघां विरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.