

Gangakhed elderly man found deadbody
गंगाखेड : शहरातील नेहरू चौक परिसरात राहणारे 65 वर्षीय एहसान खान हाफिजउल्ला खान यांचा संशयास्पद मृत्यू सोमवारी (दि. 7) सकाळी उघडकीस आला. खान हे आपल्या राहत्या घरात छताला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या गळ्यावर आणि हातावर जखमा आढळून आल्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एहसान खान हे शीतल जल चा व्यवसाय करत होते. ते 6 जुलै रोजी रात्री 10 वाजता जेवण करून दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेले होते. सकाळी घरातील सदस्यांनी खिडकीतून पाहिले असता, ते गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. तात्काळ गंगाखेड पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, प्राथमिक तपासात गळा व हातावरील जखमा लक्षात आल्याने मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणी येथून श्वानपथक बोलवण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. गंगाखेड पोलिसात अकस्मात मृत्यू ची नोंद झाली असून पुढील तपास गंगाखेड पोलीस करीत आहेत. एहसान खान यांच्या पश्चात आई, पत्नी, एक विवाहित व एक अविवाहित मुलगी असा परिवार आहे.