

परभणी/सोनपेठ : तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी 10 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 8 हजार स्वीकारताना सोनपेठ पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.6) गंगाखेड येथे झाली.
भगवान विठ्ठल मुंढे पोलीस हवालदार, पो.स्टे.सोनपेठ असे लाच स्वीकारताना पकडलेल्याचे नाव आहे. ते गंगाखेड येथील कोदरी रोड, यज्ञभूमी परिसरात राहतात. एसीबी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड येथील ओमकार नगर परिसरातील 70 वर्षीय तक्रारदार गोशाळा चालविण्याचा व्यवसाय करतात. सुमारे दीड वर्षांपूर्वी काही इसमांनी त्यांच्या गोशाळेत एक गाय व दोन वासरे सोडली होती. यानंतर दि.18 फेब्रुवारीला ते गोशाळेत आले असता तक्रारदारांची मुलगी तेथे उपस्थित होती. त्यांनी तिला अश्लील शिवीगाळ करून सदर गाय व वासरे जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना घडली.
तक्रारदारांच्या मुलीने सोनपेठ ठाण्यात तक्रार दिली. याची चौकशी जमादार भगवान मुंढे यांच्याकडे दिली. अर्जावर कारवाईसाठी मुंढे यांनी तक्रारदारांकडे 10 हजारांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे केली. त्यानुसार 25 फेब्रुवारीला गंगाखेड-परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्वलक्ष्मी रसवंती गृह येथे लाच मागणी पडताळणी झाली. या दरम्यान मुंढे यांनी 10 हजारांची मागणी केली होती. मात्र तक्रारदारांनी तडजोडीअंती 8 हजार देण्याचे सांगितले असता आरोपीने ती रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शविली. नंतर 6 मार्चला त्याच ठिकाणी सापळा रचला.
या कारवाई दरम्यान भगवान मुंढे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष 8 हजारांची लाच स्वीकारली यावेळी एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आरोपीच्या अंगझडती दरम्यान त्याच्याकडे सॅमसंग कंपनीचा मोबाईल, एक वॉलेट, पोलीस ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, 650 रुपये रोख आढळले. मोबाईलची तपासणी करून आवश्यकता असल्यास जप्त करण्याची तजवीज ठेवली. आरोपीच्या राहत्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.
याप्रकरणी सोनपेठ पोलीसांत गुन्हा नोंद झाला. आरोपीची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पाठविल्याने नातेवाईकांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनात झाली. तपास पोलीस निरीक्षक मनिषा पवार करीत आहेत.