

सोनपेठ ः नगर परिषदेच्या निवडणुकीचे मतदान अखेर शांततेत पार पडले असून आता ईव्हीएममध्ये बंद झालेल्या मतदानाचा आकडा काय सांगतो, याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. मतदान संपताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून पक्षांचे प्रमुख नेते, उमेदवार व कार्यकर्ते ‘प्रभागनिहाय मतदान आकडेवारी’ चाचपडत संभाव्य निकालाचे समीकरण मांडण्यात गुंग झाले आहेत.
सोनपेठ येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी तब्बल 6 उमेदवार, तर सदस्यपदासाठी 55 उमेदवार रिंगणात असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरुद्ध सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी अशी थेट लढत रंगली आहे. दोन्ही बाजूंनी मतदारांना आकृष्ट करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार मोहीम राबविण्यात आली होती.
मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच दोन्ही आघाड्यांनी आपल्या बूथ लेव्हल कार्यकर्त्यांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. कुठल्या प्रभागात किती मतदान झाले, कोणत्या उमेदवारांचे किती मतांवर वर्चस्व राहू शकते, प्रत्यक्ष निकालात किती फरक पडू शकतो, याची गणिते तयार करण्याचे काम सुरू आहे. काही प्रभागांत अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाल्याने काही उमेदवारांची चिंता वाढली, कमी मतदानातील प्रभागांत ‘साइलेंट वोटर’चा प्रभाव स्पष्ट जाणवेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
अनेक प्रभागांत मतदानात मोठे चढ-उतार दिसले. काही भागांत मतदानाचा टक्का उसळला तर काही ठिकाणी कोसळला. यामुळे ज्या पक्षाने किंवा उमेदवाराने विशिष्ट आकड्याचा अंदाज ठेवला, त्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. परिणामी, निकालाबाबत अचूक अंदाज बांधणे अधिकच कठीण झाले. शहराची नजर आता फक्त ईव्हीएममधील कौलकडे लागली.
मतदान संपले असले तरी नेमका फैसला काय असेल, हे जाणून घेण्यासाठी सर्वांना निकालाच्या दिवसाची आतुरता आहे. त्यातही सत्ता कोणाकडे झुकणार यापेक्षा, प्रभागनिहाय मते किती फिरली, अंतर्गत बंड किती परिणामकारक ठरले, हे पाहणे अधिक उत्सुकतेचे ठरणार आहे.
अंतर्गत मतांतरणाचा फटका?
काही संवेदनशील प्रभागांत पक्षांतर्गत नाराजीमुळे मोठ्या प्रमाणात मतांतरण झाल्याची चर्चा आहे. मतदानाचा अंदाज घेताना या मतांतरणाचा निकालात निर्णायक परिणाम होऊ शकतो, असे स्थानिक राजकीय निरीक्षक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख गटांतील नेते विशेषतः खबरदारी घेत असून संभाव्य धक्क्यांची तयारी ठेवत आहेत.
सोशल मीडियावर विजयाचे दावे
दरम्यान, नगर पालिकेसाठीचे मतदान पूर्ण होताच सोशल मीडियावर दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे केले जात आहेत. आमचाच नगराध्यक्ष, बहुमत आमच्याच बाजूला अशा संदेशांचा वर्षाव होत आहे. तथापि, प्रत्यक्ष मतदानाचे तटस्थ विश्लेषण करणे कठीण असल्याने हे दावे फक्त मनोबल वाढविण्यापुरते असल्याचे दिसत आहे.