

हिंगोली ः कळमनुरी तालुक्यातील पोतरा तेलंगवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या दगावल्याची घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली. वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून परिसरातील शेतकरी व शेतमजूरांनी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
कळमनुरी तालु्क्यातील पोतरा तेलंगवाडी शिवारात काशीराम मोदे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील आखाड्यावर शेळ्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी काशीराम हे घरी गेले होते. रात्रीच्या सुमारास बिबट्याने आखाड्यावर येऊन दोन शेळ्यांचा फडशा पाडला. शुक्रवारी सकाळी काशीराम हे शेतात गेले असतांना त्यांना शेतातील दोन शेळ्या मृतावस्थेत दिसून आल्या. सदर शेळ्या बिबट्यानेच खाल्ल्याची चर्चा सुरु झाली.
या घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवाजी काळे, कृष्णा चव्हाण, वनरक्षक खंडागळे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळावर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले नसले तरी शेळ्यांच्या मानेवर झालेल्या हल्यामुळे हा बिबट्याच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या पथकाला पाचारण करून मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
या घटनेमध्ये काशीराम यांना तातडीची शासकीय आर्थिक मदत मंजुरीची कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या पथकाने सुरु केली आहे. दरम्यान, सदर क्षेत्रात बिबट्या असल्याची खात्री वन विभागाने केली असून शेतकरी, शेतमजूरांनी काळजी घ्यावी. शेतात रात्री-पहाटे एकट्याने जाणे टाळावे. शेतात जाणे आवश्यक असल्यास गटाने जावे. तसेच गावात व आखाड्यावर घराच्या बाहेर झोपणे टाळण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
या भागात वन विभागाने ट्रॅप कॅमेरे बसविण्याच्या हालचाली सुरु केल्या असून दोन ट्रॅप कॅमेरे बसविले जाणार असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. वन व वन्यजीवाच्या संदर्भात संरक्षण, वन गुन्हा किंवा संघर्षाची स्थिती निदर्शनास आल्यास तत्काळ हेलो फॉरेस्ट 1926 या हेल्प लाईनवर संपर्क साधण्याचे करण्यात आले .