

सोनपेठ : तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असून दिवसाकाठी शेकडो झाडे जमीनदोस्त केली जात आहेत. याकडे वन विभागाचे पुर्णतः दुर्लक्ष होत असल्याने सर्रास वृक्षतोड होत आहे. अवैध वृक्षतोड थांबविण्यात यावी अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांकडून होत आहे.
सोनपेठ परिसरासह तालुक्यातील शेळगाव, आवलगाव, वडगाव, नरवाडी, उखळी, डिघोळ, धामोनी, खडका, कान्हेगाव, सायखेडा यांसह अन्य विविध गावांमध्ये अवैध वृक्षतोड करणारे सक्रिय झाले आहेत. दिवसाढवळ्या वृक्षांची सर्रास कत्तल करून शेकडो झाडे जमीनदोस्त केली जात आहेत. ही अवैध वृक्षतोड होत असल्याचे संबंधित वन विभागाला माहिती असताना देखील या गंभीर बाबीकडे वन विभागातील अधिकारी व कर्मचारी हे जाणुनबुजुन दुर्लक्ष करीत आहेत.
अवैध वृक्षतोड करणाऱ्या अनेक टोळ्या तालुक्यात सक्रिय झाल्या असून इलेक्ट्रॉनिक करवतांच्या यंत्राद्वारे मोठमोठे झाडे अवघ्या काही तासांतच कापून टाकली जात आहेत. सर्रासपणे दिवसाढवळ्या ट्रॅक्टरमध्ये लाकुड भरून वन विभागाच्या नाकावर टिच्चून वाहतूक केली जात आहे.
एकीकडे शासन दरवर्षी वृक्ष लागवड करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. अन् दुसरीकडे दहा ते पंधरा वर्षांपूर्वीचे झाडांची कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडुन ऱ्हास होत आहे. भविष्यात उष्णतेचा विचार करून तालुक्यात होणारी अवैध वृक्षतोड वन विभागाच्या वतीने थांबविण्यात यावी अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांकडून होत आहे.