

नागपूर : कोल्हापूर परिसरातून शक्तिपीठ महामार्ग (Shaktipith Mahamarg) व्हावा, अशी मागणी असणार्या शेतकर्यांचे निवेदन घेऊन कोल्हापूरचेच लोकप्रतिनिधी मला भेटले आहेत. त्यामुळे सर्वांना फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने मार्ग काढत, सर्वांना विश्वासात घेत शक्तिपीठ महामार्ग उभारला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. शक्तिपीठ महामार्गाचे फायदे पटवून देत आणि जास्तीत जास्त मोबदला देत हा प्रकल्प मार्गी लावण्यावर आपला भर असल्याचेही त्यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यास शेतकर्यांसह शेतकरी संघटना, राजकीय पक्षांचा विरोध आहे. आंदोलनेही करण्यात आली आहेत. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग होणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबाबत मी यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आहे.
त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत कुणीही विरोध केलेला नाही. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्यांचे निवेदन घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी मला भेटले. या शेतकर्यांनी शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन केले आहे. मी सर्वांना विश्वासात घेऊन शक्तिपीठ महामार्गाचे फायदे पटवून देणार आहे. शेतकर्यांना जास्तीत जास्त मोबदला देत शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्र्यांचे पीएस, ओएसडी देखील मुख्यमंत्री ठरवितात, असे म्हटले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंत्र्यांचे पीएस, ओएसडी यांच्या नावांना मुख्यमंत्री कार्यालयातूनच शिक्कामोर्तब केले जाते. यात नवीन काहीही नाही. कदाचित कोकाटे यांना हे माहिती नसावे. मुळात यासंबंधीची आपल्या सोयीची नावे पाठविण्याचे स्वातंत्र्य त्यांना असते. तुम्ही पाहिजे ती नावे पाठवू शकता. मात्र यात फिक्सर, चुकीच्या कामात गुंतलेली मंडळी नको हे बघणे महत्त्वाचे आहे. माझ्याकडे आलेल्या 125 पैकी 109 नावांना मी मान्यता दिली आहे. मात्र उर्वरित लोक ज्यांच्यावर कुठले ना कुठले आरोप, चौकशी सुरू आहे असे आहेत. कुणीही नाराज झाले तरी मी अशा नावांना मान्यता देणारच नाही, असेही फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.