

Sensational Daylight Robbery; Accused Sentenced to 5 Years of Rigorous Imprisonment
परभणी, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालुक्यातील लिमला परिसरात २०१४ मध्ये घडलेल्या भरदिवसा दरोड्याच्या थरारक घटनेला अखेर न्यायालयीन लगाम बसला असून, मुख्य आरोपीस सोमवारी (दि.२०) कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. १८ लाख ९० हजार रुपयांच्या लुट प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी बाबुराव उर्फ गुरु मारोतराव सावळे याला ५ वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावत कायद्याचा धाक दाखवला आहे.
घटनेच्या दिवशी फिर्यादी व त्यांचा सहकारी हे स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शाखेतून मोठी रक्कम काढून कारने जात होते. वनामकृवी परिसरात दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्या वाहनाला आडवे येत अचानक हल्ला चढवला. कारची काच फोडून आत घुसत आरोपींनी धक्काबुक्की व मारहाण करत १८.९० लाख रुपयांची रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली. या धाडसी दरोड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळावरील पुरावे गोळा करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक पुरावे आणि माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला आणि त्यांच्याकडून लुटलेली रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
न्यायालयीन प्रक्रिये दरम्यान सरकारी पक्षाने ठोस पुरावे आणि प्रभावी युक्तिवाद सादर केला. अॅड. आनंद गिराम यांनी मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजू भक्कमपणे मांडली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.आर.नाईकवाडे यांनी आरोपी बाबुराव उर्फ गुरु सावळे यास दोषी ठरवत ५ वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्यांचा कारावास, तसेच अतिरिक्त १ हजार रुपयांचा दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे.
या गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नितीन डोंबे तसेच कर्मचारी अशोक नागरगोजे, वंदना आदोडे आणि सचिन धबडगे यांनी मोलाची भूमिका बजावली. भरदिवसा घडलेल्या या दरोड्याच्या घटनेत पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि न्यायालयाने दिलेला कठोर निकाल यामुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायद्याचा धाक अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.