

परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीच्या डॉ. विवेक नावंदर यांचा ८३ मतांनी पराभव करत महायुतीचे सईद खान हे २४२ मते घेऊन विजयी झाले आहेत.
परभणी-हिंगोलीत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तिरंगी लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महायुतीकडून शिंदे सेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेनेचे डॉ. विवेक नावंदर तर अपक्ष म्हणून सुशील देशमुख निवडणूक रिंगणात उतरले होते. विधान परिषद निवडणुकीच्या जागेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये उमेदवारीवरून तीव्र चुरस निर्माण झाली होती.
शिंदे सेनेला जागा सुटल्यानंतर महायुतीमध्ये समन्वय राहील काय? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला होता. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महायुतीचा धर्म पाळत महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती. या निवडणुकीत सर्वाधिक १३१ मतदार संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडेही लक्ष लागले होते. प्रारंभी अपक्ष उमेदवाराच्या इंट्रीमुळे निवडणुक तिरंगी होईल, असे वाटत होते. परंतु निवडणूक निकालानंतर महायुतीत व महाविकास आघाडी अशी सरळ लढत झाल्याचे दिसून आले.
सोमवारी (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली. यात महायुतीचे उमेदवार सईद खान यांना पहिल्या पसंतीची २४२, महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ तर अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांना ५६ मते मिळाली. ८ मते अवैध ठरली आहेत. निवडणुकीत महायुतीतील मते मोठ्या प्रमाणात फुटल्याचे उघड झाले आहे.
उबाठा शिवसेना पक्षाचे केवळ ४३ मतदार असताना व काँग्रेसची बहुतांश मते ही अपक्ष उमेदवार सुशिल देशमुख यांच्या पारड्यात पडल्यानंतरही महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांनी तब्बल १५९ मते मिळवत चांगली लढत दिल्याचे दिसून येत आहे सईद खान यांनी विजयानंतर माध्यमांशी बोलताना आपला विजय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांना समर्पित करत असल्याचे सांगितले.
विधान परिषद निवडणुकीसाठी सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर व बोर्डीकर कटुंबीयांचे तसेच सहकार्य करणाऱ्या अन्य लोकप्रतिनिधींचेही आभार मानले. सईद खान विजयी होताच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात त्यांचे समर्थक कार्यकर्ते व शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमाणपत्र स्वीकारतेवेळेस सईद खान यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, पाथरीचे नगराध्यक्ष आसेफ खान, राजू कापसे पाटील, अतुल सरोदे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मतमोजणी केंद्रात शाब्दिक चकमक
मतमोजणी केंद्रात शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना पोलिस अधिकारी यांनी धक्का दिल्याच्या आरोप करत पोलिस अधिकारी व नूतन आमदार सईद खान यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे पहावयास मिळाले. विशाल कदम हे जिल्हाप्रमुख असून तुम्ही त्यांना धक्का मारताच कसा असा सवाल सईद खान यांनी उपस्थित केला. यावेळी सभागृहात उपस्थित असलेले जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सईद खान यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.