Parbhani Hingoli MLC election : महायुतीमध्ये वरून समन्वय; आतून धुसफूस

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : महायुतीचे सईद खान यांना मित्र पक्षाची घ्यावी लागणार काळजी
MLC Election
MLC Electionpudhari photo
Published on
Updated on

सुभाष कच्छवे

परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या सुशील देशमुखांच्या उमेदवारीमुळे बिघाडी झाली आहे. मतांची ताकद जादा असलेल्या महायुतीमध्ये सारेकाही अलबेल नसून वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी वरून समन्वय घडवून आणला असला तरी महायुतीतील तिनही घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे वास्तव असून यामुळे महायुतीच्या उमेदवाराला दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सत्य आहे. एकंदरीत महायुती व महाविकास आघाडीतील विधान परिषदेची लढत रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप व शिंदेंच्या शिवसेने मध्ये उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश विटेकर यांनी परभणी-हिंगोली विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते, परंतु या प्रयत्नात त्यांना यश आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्यानंतर भाजपानेही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपला जागा सोडण्याची मागणी केली होती.

MLC Election
Parbhani Hingoli MLC Election : ठाकरे सेनेकडून डॉ. नावंदर रिंगणात उतरणार

5 इच्छुकांपैकी ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल, त्याला निवडून आणण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला होता. शेवटच्या क्षणी परभणीची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या पारड्यात पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राजेश विटेकर, गंगाखेडचे आ. रत्नाकर गुट्टे हे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित नव्हते.

याचीही राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. तदनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी परभणीत येत नाराज असलेल्या आ. राजेश विटेकर, आ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत महायुतीतील नेत्यांची बैठक घेऊन विधान परिषद निवडणुकीत काही दगाफटका हेोऊ नये म्हणून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांचे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आ. राजेश विटेकर यांनी महायुतीच्या उमेदवाराचा नामोल्लेख टाळत महायुतीचा उमेदवार विजयी होईल, असे सांगितले होते.

महायुतीचे उमेदवार सईद खान यांनीही बैठकीमध्ये आ.राजेश विटेकर, आ. रत्नाकर गुट्टे यांचा नामोल्लेख टाळला होता. विधानसभा निवडणुकीत पाथरी विधानसभा मतदार संघातून आ. राजेश विटेकर व सईद खान एकमेकांच्या विरोधात लढले होते. यावेळी दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. सईद खान-आ. राजेश विटेकर यांच्यात फारसे सख्य नाही. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर व आ.राजेश विटेकर, आ. रत्नाकर गुट्टे हेही एकमेकांपासून फटकून राहिल्याचा आजतागायतचा इतिहास आहे.

MLC Election
Nanded legislative council election : वि.प.निवडणूक : महायुतीत नांदेडची जागा भाजपाला सुटल्यातच जमा!

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिंदेंच्ाी शिवसेना या महायुतीतील 3 घटक पक्षांमध्ये आजतागायत श्रेय वादावरून अनेकवेळेला कलगीतुरा रंगल्याचा इतिहास आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या आदेशावरून विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये समन्वय असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले असले तरी वरील तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धूसफूस असल्याचे वास्तव आहे. महायुतीचे उमेदवार सईद खान यांना या साऱ्याबाबीवर मात करत मार्गक्रमण करावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news