

परभणी : राज्य सरकारने सादर केलेल्या जन सुरक्षा विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी देऊ नये, तसेच कृषीमंत्री यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकार्यांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
जनसुरक्षा विधेयक घाईघाईने आवाजी मतदानाने मंजूर केले असून ते लोकशाहीच्या मुल्यांच्या पूर्णतः विरोधात आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे हे विधेयक राज्यपालांनी मंजूर करू नये, अशी विनंती केली. कृषीमंत्री हे सभागृह चालू असताना ऑनलाईन गेम (रमी) खेळत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यांनी अनेकदा शेतकरी विरोधात विधाने केली, त्यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरला नाही. यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.
निवेदनात लातूर येथील छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील मारहाणीचाही निषेध केला. निवेदनावर शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, सरचिटणीस बाळासाहेब फुलारी, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, माजी जि.प.अध्यक्ष रामभाऊ घाडगे, माजी महापौर रवि सोनकांबळे, युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल जाधव, माजी सभापती सुनील देशमुख, गुलमीर खान, नागसेन भेरजे, शेख मतीन आदींच्या स्वाक्षर्या आहेत.