गंगाखेड येथील काही गावांमध्ये मागील अनेक महिन्यांपासून अवैध दारू विक्री सुरु होती. त्यामुळे गावातील अनेक ग्रामस्थ व्यसनाधीन झाले होते. या गोष्टीला कंटाळून रावराजूरात माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर शिंदे यांच्या सोबत गावातील महिलांनी बुधवारी (दि.११) दिवसभर अवैध दारू विक्रीचे अड्डे उध्वस्त केले. यावेळी गावातील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा आहे ग्रामस्थांनी दिला आहे.
मागील काही दिवसांपासून परिसरामध्ये दारू विक्रेत्यांची अरेरावी वाढल्याने ग्रामस्थांनी सोमवारी (दि.९)जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. निवेदनानंतर दारू विक्रेत्यांची वाढलेली मुजोरगिरी मोडीत काढण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर शिंदे यांच्या पाठबळामुळे गावातील महिला रणरागिनींनी अवैध दारूचे अड्डे उध्वस्त करण्याचा धाडसी निर्णय प्रत्यक्षात आणला.
महिला रणरागिणी सरपंच पल्लवी सचिन साळवे, शांताबाई गोबाडे, प्रयागबाई खंदारे, सरुबाई साळवे, रुक्मिणीबाई खोडके, केरुबाई लांडे, शालुबाउ जोंधळे, मंगलबाई खोडके, उपसरपंच शेख अजगर भाई, संदीप शिंदे, चंद्रकांत शिंदे, भैय्या साळवे, देवा साळवे, शिवराज स्वामी आदींसह ८० ते १०० ग्रामस्थांनी मोहीम यशस्वी केली. गंगाखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश गांगलवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन अवैध दारू विक्रेत्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. दरम्यान रावराजुर गावातील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी व दारू विक्रेत्यांवर कडक गुन्हे दाखल करावेत अन्यथा ग्रामस्थ लवकरच अमरण उपोषण करणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर शिंदे यांनी दिली.