

Raid on Gas Refilling and Flavored Tobacco Factory
परभणी, पुढारी वृत्तसेवा शहरातील उस्मानिया कॉलनी परिसरात घराच्या आडून सुरू असलेल्या बेकायदेशीर गॅस रिफिलिंग आणि सुगंधी तंबाखू निर्मितीच्या कारखान्यावर नानलपेठ ठाण्यातील पोलिसांनी रविवारी (दि.२९) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आनक धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ३ लाख १३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
नानलपेठ ठाण्यातील पोलीस कर्मचारी संतोष सानप यांच्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद जमाल सय्यद नबी (वय २८, रा. उस्मानिया कॉलनी, परभणी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात उघड झाले की, आरोपी सय्यद जमाल हे आपल्या राहत्या घरातच घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा करून एका सिलेंडरमधून दुसऱ्यात गॅस भरण्याचा धोकादायक व्यबसाय करत होते.
यासाठी त्याने विशेष मशीन, पाईप व मोटार यांचा वापर केला होता. या प्रकारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात होती. याशिवाय, आरोपीकडून मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू, किमाम, पान मसाला तयार करण्यासाठी लागणारे विविध साहित्य, तसेच पॅकिंग मशीन जप्त करण्यात आली आहे. या तंबाखूमध्ये मानवी आरोग्यास घातक ठरणारे रसायनेही आढळून आली आहेत. विशेष म्हणजे, हा संपूर्ण व्यवसाय कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे चालवला जात होता.
आरोपी सय्यद जमाल सय्यद नवी याच्या घराची तपासणी केली असता, खालच्या मजल्यावर अवैधरित्या साठवलेले ३ भरलेले व ५ रिकामे गॅस सिलेंडर, तसेच गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक मोटार व इतर साहित्य आढळून आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, अत्यावश्यक वस्तू अधिनियम तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षकांकडे सोपविण्यात आला असून आरोपी सध्या पोलीसांच्या ताब्यात आहे. या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी वचक बसवण्याचा प्रयत्न केला असल्याचे मानले जात आहे. पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नानलपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती करवार, पोलीस उपनिरीक्षक बेंद्रे, नायब तहसीलदार दिपक नागरगोजे तसेच दवंडे, इरफान, जाधव, केंद्रे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
नानलपेठ पोलिस ठाण्यातील पथकाने धाड टाकुन केलेल्या जप्तीत हजारो पॅकेट्स, तंबाखूची पोती, किमाम, तसेच पान मसाला बनवण्यासाठी लागणारे विविध रासायनिक घटक सापडले. यामध्ये लिक्विड पॅराफिन, ग्लिसरीन, डीओपी, पीजी यांसारखे पदार्थही होते, जे मानवी आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकतात. या सर्व साहित्याचा वापर करून तयार करण्यात येणारा तंबाखू बाजारात विक्रीसाठी पाठवला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारवाई दरम्यान गॅस संबंधित साहित्याची किंमत सुमारे २३ हजार रुपये असून तंबाखू व संबंधित साहित्याची किंमत सुमारे २ लाख ९० हजार ८४० रुपये असल्याचे स्पष्ट झाले. अशा प्रकारे एकूण ३ लाख १३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.