

Purna Tukaimata in Avai is a place of worship for lakhs of devotees
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आव्हई येथील ग्रामदैवत श्रीक्षेत्र तुकाईमाता हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले. जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध या मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, तुकाईमातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
तुकाईमाता नवसाला पावणारी देवी म्हणून श्रद्धा आहे. श्रद्धेने तुकाईमातेची आराधना केल्यानंतर मनोकामना पूर्ण झाल्याचे अनेक भाविक सांगतात. त्यामुळे नवरात्रोत्सव काळात आव्हई येथे भाविकांचा ओघ वाढत आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊही दिवस रात्री तुकाईमातेचा पारंपरिक गोंधळ व जागर केला जातो. देवीच्या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमून जात असून, भाविक मोठ्या भक्तिभावाने जागरात सहभागी होताहेत.
या धार्मिक परंपरेमुळे नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. तुकाईमाता मंदिराबाबत प्राचीन आख्यायिका ग्रामस्थांकडून सांगितली जाते. पूर्वी तुकाईमातेच्या लाकडी मूर्ती पाण्यातून वाहत येऊन गावात आल्या होत्या. ग्रामस्थांनी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर अनादी काळापासून येथे नवरात्रोत्सव साजरा होत असल्याचे सांगितले जाते.
आजही मंदिरात त्या लाकडी मूर्ती पाहायला मिळतात. याबाबत ग्रामस्थ गणेशराव बुचाले यांनी मंदिराची आख्यायिका व नवरात्रोत्सव परंपरेची माहिती दिली. विजयादशमीला सकाळपासून सायंकाळपर्यंत ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन होते.
नवरात्र उत्सवात तुकाई मातेचे दर्शनासाठी पंचक्रोशीसह दूरवरून भाविक आव्हईत येतात. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाची सांगड घालणारे श्रीक्षेत्र तुकाईमाता मंदिर हे परिसरातील भाविकांच्या आस्थेचे प्रमुख केंद्र ठरले आहे.