

Purna railway Construction Worker Death
पूर्णा : पूर्णा येथील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ जवळ बुधवारी ( दि. २३) दुपारी २:३० वाजता रेल्वेखाली आल्याने एका बांधकाम मजुर युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव धिरज सुरेश काळे (वय अंदाजे ३५, रा. विजयनगर, पूर्णा) असे आहे.
तो मिस्री कामगार म्हणून काम करीत होता. दुपारी अडीच वाजता, प्लॅटफॉर्म क्रमांक ४ च्या पूर्व दिशेला रेल्वे पटरी ओलांडताना अचानक येणाऱ्या रेल्वेगाडीखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्याचे शरीर छिन्नविछिन्न झाले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
घटनेची माहिती मिळताच स्टेशन मास्टर पंकजकुमार यांनी रेल्वे लोहमार्ग पोलिसांना कळवले. तत्काळ पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि ओळख पटवली. मृतदेह पुढील तपासासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेची नोंद रेल्वे लोहमार्ग पूर्णा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सिद्धेश्वर देशमाने करीत आहेत.