

ताडकळस : पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ वर्षांपासून कुटुंब कल्याण (नसबंदी) शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन झाले नसल्याने परिसरातील महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शासनाने कोट्यवधींचा खर्च करून सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत उभारली, १० महिन्यांपासून या इमारतीत नियमित आरोग्य सेवा सुरू आहे, मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सेवा अद्याप सुरू न झाल्याने आरोग्य विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ताडकळस येथे बाजार समिती, पोलिस ठाणे, राष्ट्रीयीकृत बँका, जलसंपदाचे कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे परिसरातील २५ हून अधिक गावांतील नागरिक आरोग्य सेवेसाठी या केंद्रावर अवलंबून आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत फुलकळस, लिमला, बलसा बुद्रुक, निळा आणि खुजडा या पाच उपकेंद्रांचा कारभार चालतो. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची येथे ये-जा असते.
यापूर्वीची प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण व मोडकळीस आल्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरे बंद केली होती. त्या काळात शिबिरे बंद ठेवण्यामागे तांत्रिक कारणे होती. मात्र आता शासनाने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून नवीन प्रशस्त इमारत उभारली असून १० महिन्यांपासून सर्वसामान्य आरोग्य सेवा नियमित सुरू आहेत. असे असतानाही नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन सुरू न झाल्याने नागरिकांत नाराजी आहे.
सध्या या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील महिलांना शस्त्रक्रियेसाठी परभणी, पूर्णा, एरंडेश्वर, धानोरा काळे किंवा इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांत जावे लागत आहे. ग्रामीण महिलांसाठी हा प्रवास खर्चिक आणि त्रासदायक ठरत आहे. अनेक महिलांना लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करावा लागतो. सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित सुविधा, खासगी वाहनांचा वाढलेला खर्च आणि दिवसाचा होणारा अपव्यय यामुळे अनेक महिला शस्त्रक्रिया पुढे ढकलतात किंवा टाळतात.
परिणामी शासनाच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमालाच फटका बसत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कुटुंब नियोजन कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. ग्रामीण महिलांना त्यांच्या जवळच्या आरोग्य केंद्रात सुरक्षित व दर्जेदार शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र ताडकळससारख्या मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच ही सेवा पाच वर्षांपासून बंद असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, नवीन इमारतीत आवश्यक ऑपरेशन थिएटर, प्रशस्त जागा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध असूनही शस्त्रक्रिया शिबिरांचे नियोजन केले जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. नियमित शिबिरे सुरू झाल्यास परिसरातील हजारो महिलांना त्याचा थेट लाभ होणार असून त्यांची आर्थिक व मानसिक परवड थांबेल.
ग्रामीण महिलांना आरोग्य सेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या उद्देशाला ताडकळसमधील ही परिस्थिती हरताळ फासत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरांचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
आरोग्य राज्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करावा
परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिल्ह्यातच ग्रामीण महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी अनेक किलोमीटरची धावपळ करावी लागत असल्याची बाब गंभीर मानली जात आहे. ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने नियमित नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरे सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाला निर्देश देऊन ग्रामीण महिलांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक, महिला, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे.