Latur agriculture news : उगवलेली कोवळी पिके करपू लागली

चाकूर तालुक्यावर दुष्काळाची छाया, दुबार पेरणीचे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
Latur agriculture news
Latur agriculture newspudhari photo
Published on
Updated on

संग्राम वाघमारे

चाकूर : तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून चाकूर तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे. सुरुवातीच्या पावसाने काही भागात उगवलेली कोवळी पिकेही आता हळूहळू करपू लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जुलै महिना संपत आला असून चाकूर तालुक्यात ५८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये ६२ टक्के एवढा सर्वाधिक पेरा सोयाबीन पिकाचा असला तरी काही भागात अद्याप पेरण्या झाल्या नाहीत. सुरुवातीच्या पावसाच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आदी पिकांची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके पाण्याअभावी सद्यस्थितीत करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट उदभवले आहे.

Latur agriculture news
Garlic side effects : रोज लसूण खाताय? 'या' लोकांसाठी ठरू शकतो धोकादायक

चाकूर तालुक्यात अनेक भागांत जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपला असून कडक ऊन व कोरड्या वाऱ्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. काही शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून बियाणे, खते आणि मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. आता पुन्हा पेरणी करावी लागल्यास आर्थिक भार अधिक वाढणार असल्याची खंत तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

तालुक्यातील काही भागांत बळीराजा अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने खरीप हंगामाबाबत अनिश्चितता व्यक्त होत आहे. चाकूर तालुक्यात सुमारे 57938.87 हेक्टर क्षेत्रापैकी 34095.20 हेक्टर्स क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीन हे प्रमुख पीक असून त्याची सर्वात जास्त 28724 हेक्टर्सवर पेरणी झाली असून तूर, मूग, उडीद आणि ज्वारीची पेरणी म्हणावी तशा झाल्या नाहीत.

Latur agriculture news
Beed fisheries news : माजलगावच्या प्रकल्पात मत्स्यबीज सोडलेच नाही

चाकूर तालुक्यात आतापर्यंत ८७ मिलीमीटर पाऊस झाला असून नळेगाव, रोहिणा, चाकूर परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने त्याचा शेतीकामांवर परिणाम झाला आहे. चाकूर तालुक्यात मनावा तसा अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पेरलेली बियाणे उगवली नसल्याची धास्ती शेतकऱ्यांनी खाल्ली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून तो आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे.

  • तालुक्यातील चापोली येथील शेतकऱ्यांनी बियाणे उगवले नसल्याने कृषी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी कृषी कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. त्यावेळी महाबीजच्या माध्यमातून त्यांना बॅगा किंवा त्याचा मोबदला रक्कम दिले जाईल या लेखी आश्वासनंतर शेतकऱ्यांनी कृषी कार्यलयातील गर्दी कमी केली.

पेरणीनंतर चाकूर तालुक्यातील ४२ शेतकऱ्यांचे वाण ६१२ महाबीजचे बियाणे उगवण झाली नसल्याच्या तक्रारी कृषी कार्यलयाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले असून त्याचा अहवाल आला आहे. महाबीजकडून त्यांना मदत मिळणार आहे.

शिवचंद्रपाल जाधव तालुका कृषी अधिकारी, चाकूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news