

Patwari Kamika Ekadashi devotees crowd
दैठणा, पुढारी वृत्तसेवा परतवारी कामिका एकादशीनिमित्त दैठण्यात हजारो भाविकांनी उपस्थिती लावत मोठ्या भक्तिभावाने संत बुवासाहेब महाराज ठाकूरबुवा, संत धीरजगीर महाराज यांचे दर्शन घेतले. सकाळी साडेपाच वाजता पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. परतवारी निमित्त दैठणा पंचक्रोशीसह मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्हयातील भाविकांनी उपस्थिती लावली.
परतवारी निमित्त दैठणा ग्रामस्थांच्या वतीने येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली होती, मंदिर मार्गावरील मुख्य रस्त्यावर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. मंदिर परिसरात बाल गोपाळांसह ज्येष्ठांनीही गवळणी, विठ्ठल नामाचा जयघोष करत फुगडीही खेळली. ठाकूरबुवांच्या अश्वाचा रिंगणसोहळा ही पार पडला. गुरुकुल इंग्लिश स्कूल, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या बाल गोपाळांनी परतवारीनिमित्त दिंडी काढली. विठ्ठल रुख्माईच्या वेशात दिंडीत सहभागी झालेले बाल गोपाळ लक्ष वेधून घेत होते.
परतवारीनिमित्त परभणी, गंगाखेड, धानोरा काळे, दत्तवाडी, गौंडगाव, अंबेटाकळी, जांव रेंगे, खळी, रुमणा, सायळा, धसाडी, सुनेगाव, सुरपिंप्री, धोंडी, माळसोन्ना, पोहंडूळ, सुनेगाव सायाळा, माखणी, वडगाव सुक्रे, शंकरवाडी तांडा येथील पायी दिंड्या आल्या होत्या. दिंड्यातील विणेकऱ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. आलेल्या भाविकांसाठी साबुदाना खिचडी, केळी, चहा, राजगीरा लाडू अशी फराळाची सोय करण्यात आली होती.
परतवारी निमित्त लावण्यात आलेल्या दै. पुढारीच्या स्टॉलला सर्वसामान्य नागरिक, वारकऱ्यांसह मान्यवरांनी भेट दिली. पाथरी विधानसभा मतदार संघाचे आ. राजेश विटेकर यांच्या हस्ते पुढारीच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी विलास बाबर, डॉ. तुकाराम गरुड, उपसरपंच अभय कच्छवे, बालाजी कच्छवे, मुख्याध्यापक अर्जुन कच्छवे, भगवान पांचाळ व मान्यवरांची उपस्थिती होती. पालकमंत्री मेघना साकोरे-बोडर्डीकर यांनीही पुढारीच्या स्टॉलला भेट देत पुढारी विषयी गौरवोद्गार काढले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, अरुण भोसले, माजी जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील, उध्दव नाईक व कार्यकत्यांची उपस्थिती होती.
परभणी विधानसभा मतदार संघाचे आ. डॉ. राहुल पाटील यांनीही पुढारीच्या स्टॉलला भेट देत शुभेच्छा दिल्या. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कुरुंदकर यांनीही पुढारीच्या स्टॉलला भेट दिली. दै. पुढारीच्या वतीने सुभाष कच्छवे, बळीराम सुक्रे, प्रशांत कौसडीकर, भगवान कच्छवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
परतवारीनिमित्त पालकमंत्री मेघना साकोरे बोडर्डीकर, आ. राजेश विटेकर, आ. राहुल पाटील भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, भाजप माजी जिल्हा प्रतिनिधी प्रा. पी. डी. पाटील, विलास बाबर, अरुण भोसले, अरविंद देशमुख, गणेश घाटगे यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. दैठणा ग्रामपंचायतच्या वतीने परतवारीच्या यशस्वीतेसाठी चोख नियोजन करण्यात आले होते.