

Maharashtra Local Body Elections
आनंद ढोणे
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांच्या निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात अनेक ठिकाणी बलाढ्य धनिक उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला, तर सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी विजय मिळवून ‘जनशक्ती’चे महत्त्व अधोरेखित केले.
जिल्हा परिषद गटांमध्ये एरंडेश्वरमधून उबाठा शिवसेनेचे रितेश काळे, वझूर मध्य येथून बेबीताई कुकर, तर ताडकळस गटातून केशरबाई जल्हारे विजयी झाल्या. चुडावा गटातून भाजपाचे भरत घनदाट, कावलगाव गटातून अपक्ष अर्चना ढगे, तर गौर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोमल पारवे यांना जनतेने निवडून दिले.
या निवडणुकीत काही गटांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी मोठ्या आर्थिक ताकदीसह उमेदवार मैदानात उतरवले होते. विकासाच्या मुद्द्यांपेक्षा पैशाच्या जोरावर प्रचाराचा धुरळा उडवण्यात आला; मात्र सुजाण मतदारांनी अनेक ठिकाणी धनशक्तीला नाकारत सर्वसामान्य उमेदवारांना कौल दिला.
एरंडेश्वर जि.प. गटात भाजपाकडून डॉ. कदम यांनी ऐनवेळी उमेदवारी घेत अवघ्या पंधरा दिवसांत जोरदार प्रचार केला. मात्र अटीतटीच्या लढतीत उबाठा शिवसेनेचे रितेश काळे यांनी ३२३ मतांच्या फरकाने विजय मिळवत धनशक्तीवर जनशक्तीची सरशी सिद्ध केली.
चुडावा गटात भाजपाने मुंबईहून भरत घनदाट यांना मैदानात उतरवत मोठी ताकद लावली. त्यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेकडून गोरखनाथ भालेराव तर राष्ट्रवादीकडून अशोक धुतराज होते. तिहेरी लढतीत भरत घनदाट यांनी ४,८३० मतांची आघाडी घेत विजय मिळवला. या गटात मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्याची चर्चा नागरिकांत आहे.
कावलगाव गटात अपक्ष अर्चना ढगे यांनी जनशक्तीच्या जोरावर ७७७ मतांच्या फरकाने विजय मिळवला. यासोबतच पंचायत समिती गणात उज्ज्वला पिसाळ व मिरा खैरे यांचाही विजय झाला. भाजपाच्या उमेदवाराला येथे जनतेने स्पष्ट नकार दिला.
गौर जि.प. गटात भाजपाकडून मोठ्या खर्चात निवडणूक लढवण्यात आली; मात्र जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोमल पारवे यांना ३८७ मतांनी विजयी केले. पंचायत समितीच्या दोन्ही गणांत यशवंत सेनेचे नरेश जोगदंड व गोविंद सूर्यवंशी विजयी झाले.
ताडकळस गटात भाजपातील अंतर्गत नाराजीमुळे मतविभागणी झाली आणि उबाठा शिवसेनेच्या केशरबाई जल्हारे यांनी १,३९६ मतांच्या फरकाने विजय मिळवला. वझूर मध्य गणातही उबाठा शिवसेनेच्या बेबीताई कुकर यांनी १,६७८ मतांची आघाडी घेत बाजी मारली.
दरम्यान, गौर जि.प. गट व कावलगावमधील धानोरा मोत्या गण हे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होते. मराठा कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळाल्याने गौर गटातून कोमल पारवे, तर धानोरा गणातून मिरा खैरे विजयी झाल्या. या दोघींनाही मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे कुणबी नोंदी मिळाल्याने प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यामुळे या विजयाला ‘जरांगे पॅटर्न’चा मोठा वाटा असल्याची चर्चा नागरिकांत होत आहे.
एकूणच, पूर्णा तालुक्यातील या निवडणुकीत धनशक्तीपेक्षा जनतेशी नाळ जुळलेल्या उमेदवारांनाच मतदारांनी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.