

परभणी : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झालेले आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत 54 पैकी भाजप सर्वाधिक 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर असताना, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि उध्दव ठाकरे शिवसेना यांची भूमिका सत्तासमीकरणात निर्णायक ठरणार आहे.
यातूनच अध्यक्षपदासाठी अनुसूचीत जाती प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव 4 तर पुरूषांसाठीच्या राखीव 3 गटांमधुन अध्यक्ष निवडला जाणार आहे. यामुळे नेमकी अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळयात पडणार हे राजकीय सत्तासमिकरणांनतरच स्पष्ट होणार आहे. झेडपीवर सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठकांना सुरूवात झाल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दि.7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले तर दि.9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात आली. निवडणुक निकालानुसार जिल्हा परिषदेच्या एकुण 54 पैकी भाजपला 24 जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 15 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 6, शिंदे शिवसेनेला 5, काँग्रेसला 3 तर 1 अपक्ष सदस्य निवडून आले आहेत. एकूण 54 सदस्यीय जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमतासाठी 28 सदस्यांची गरज लागणार आहे.
अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने या प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांमध्येच अध्यक्षाची निवड होणार आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव गटांमधून जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा गटातून भाजपच्या लता वाकळे, परभणी तालुक्यातील पिंगळी गटातून शिंदे शिवसेनेच्या पूजा सावंत, सोनपेठ तालुक्यातील उखळी बुद्रुक गटात राष्ट्रवादीच्या माया मुजमुले तर पूर्णा तालुक्यातील कावलगाव गटातून अपक्ष अर्चना ढगे या विजयी झाल्या आहेत.
पुरुष गटातून राखीवमधून पूर्णा तालुक्यातील चुडावा गटातून भाजपचे भरत घनदाट, याच तालुक्यातील ताडकळस गटातून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे केशरबाई जल्हारे तर पालम तालुक्यातील चाटोरी गटातून भाजपचे अमित घनदाट हे निवडून आले आहेत. दरम्यान, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी निवडणुक निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना भाजप व शिंदे शिवसेनेची युती करून जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचे संकेत दिलेले आहेत. पण आ.रत्नाकर गुट्टे यांचाही निर्णय महत्वाचा आहे.
भाजपमधून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सावंगी म्हाळसा गटातील लता वाकळे, चुडावा गटातील भरत घनदाट किंवा चाटोरी गटातून अमित घनदाट यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. तर दुसरीकडे, शिंदे शिवसेनेने अध्यक्षपदावर दावा ठोकल्यास पिंगळी गटातून विजयी झालेल्या पूजा सावंत या प्रमुख दावेदार ठरू शकतात. मात्र अध्यक्षपद भाजपकडे गेल्यास शिंदे शिवसेना पक्ष हा उपाध्यक्षपदावर दावा करण्याची दाट शक्यता असून अशावेळी परभणी तालुक्यातील टाकळी बोबडे गटातून निवडून आलेल्या सुचिता भरोसे यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी पुढे येणार असल्याचीही जोरदार चर्चा रंगत आहे.
दरम्यान पूर्णा तालुक्यातील ताडकळस गटातून उबाठा शिवसेनेच्या केशरबाई जल्हारे पुरूष राखीवमधून विजयी झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माया मुजमुले या सोनपेठ तालुक्यातील उखळी बु. गटातून विजयी झाल्या. एकीकडे भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून नैसर्गिक हक्क सांगत आहे, तर दुसरीकडे शिंदे शिवसेना युतीतील वाट्याचा आग्रह धरत असल्याने अध्यक्षपदावरून ताण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे परभणी जिल्हा परिषदेची सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाणार आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील कोणता चेहरा अध्यक्षपदाची माळ गळ्यात घालणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
भाजपची सत्ता रोखली जाणार का?
जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणुक लढवलेली आहे. यातच सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांनी भाजपवर जोरदार टिकास्त्रही सोडलेले आहे. यामुळे या सत्तासमिकरणांत भाजप 24 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनला असला तरी उबाठा शिवसेना 6, शिंदे शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 15, काँग्रेस 3 असे संख्याबळ घेवून हे पक्ष एकत्र आल्यास 29 संख्या होवू शकते व अध्यक्षपदासाठी केवळ 28 सदस्यांची गरज असल्याने हे पक्ष भाजपला सत्तेपासून रोखू शकतात अशीही चर्चा रंगत आहे. यामुळे आगामी काही काळातच भाजप व शिंदे सेनेची युती होते की उर्वरीत राजकीय पक्ष आपली खेळी करण्यात यशस्वी होतात हे अध्यक्षपद निवडीप्रसंगीच सिध्द होईल.