Parbhani News | पाणी आहे, पण शेतकरी तहानेलाच; येलदरी धरणाचे नियोजन कोलमडले

उजव्या कालव्याबाबत शासनाची उदासीनता; हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्याची शक्यता
Parbhani News | पाणी आहे, पण शेतकरी तहानेलाच; येलदरी धरणाचे नियोजन कोलमडले
Published on
Updated on

जिंतूर : तालुक्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणारे येलदरी धरण आजही अनेक प्रश्नांनी वेढलेले आहे. मराठवाड्यातील महत्त्वाच्या मातीच्या धरणांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या येलदरी धरणातून मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध असतानाही जिंतूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. विशेषतः उजव्या कालव्याच्या प्रश्नाकडे शासनकर्ते आणि संबंधित विभागांकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.

येलदरी धरण हे केवळ पाणी साठवणुकीसाठीच नव्हे तर वीज निर्मितीसाठीही महत्त्वाचे केंद्र आहे. या धरणातून निर्माण होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पामुळे शासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असल्याचे सांगितले जाते. मात्र, या धरणाच्या पाण्याचा सर्वाधिक लाभ जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असताना अनेक भाग आजही सिंचनाच्या सुविधांपासून वंचित आहेत.

Parbhani News | पाणी आहे, पण शेतकरी तहानेलाच; येलदरी धरणाचे नियोजन कोलमडले
Koyna Dam : अनेक वर्षांपासून धरण सुरक्षा ऑडिट झालेच नाही

स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या मते, येलदरी धरणातील पाण्याचा मोठा उपयोग नांदेड जिल्ह्यातील काही भागांना होत असल्याचे दिसून येते. परभणी जिल्ह्यातील विशेषतः जिंतूर तालुक्यातील शेती मात्र अद्यापही पावसाच्या भरवशावर आहे. दरवर्षी अनियमित पाऊस, दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, येलदरी धरणातून उजवा कालवा काढून त्याचे जाळे प्रभावीपणे विकसित करण्यात आले तर जिंतूर तालुक्यासह परिसरातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा यांसारख्या पारंपरिक पिकांबरोबरच फळबागा, भाजीपाला आणि नगदी पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

Parbhani News | पाणी आहे, पण शेतकरी तहानेलाच; येलदरी धरणाचे नियोजन कोलमडले
Nashik Dam Water Crisis| उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणीबाणी! 5 लाख नागरिकांची तहान भागवण्यासाठी 226 टँकर मैदानात

शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, येलदरी धरणातून वीज निर्मिती करून शासनाला महसूल मिळत असताना त्या धरणाच्या पाण्याचा शेतीसाठी अधिकाधिक उपयोग करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. कालवा प्रकल्प पूर्ण झाल्यास केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर कृषी आधारित उद्योग, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळू शकते.

जिंतूर तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे की, जलसंपत्ती आपल्या दारात असूनही शेती कोरडवाहू राहणे ही शोकांतिका आहे. शासनाने येलदरी धरणाच्या उजव्या कालव्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवून सिंचन सुविधा उपलब्ध करून दिल्यास तालुक्याचे कृषीचित्र बदलू शकते. यामुळे उत्पादनवाढ होऊन शासनालाही महसूलाच्या स्वरूपात कोट्यवधी रुपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे. येलदरी धरण हे जिंतूर तालुक्यासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरावे, अशी अपेक्षा शेतकरी आणि नागरिकांकडून व्यक्त होत असून आता शासन या मागणीकडे कितपत सकारात्मक दृष्टीने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news