

परभणी : हळदीच्या पिकाच्या आडून बेकायदेशीर गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. कान्हा शिवारातील शेत गट क्रमांक ३० येथे केलेल्या या कारवाईत तब्बल १६.४५५ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत ८ लाख २२ हजार ७५० रुपये आहे. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना मंगळवारी (दि. ६) रात्री ९.१५ वाजता मौजे कान्हस शिवारातील एका शेतात हळदीच्या पिकामध्ये गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन बामणी आणि स्थानिक गुन्हे शाखा, परभणी यांच्या संयुक्त पथकाने संबंधित शेतावर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान संतराम त्र्यंबक दुबळकर (वय ४५, व्यवसाय शेती, रा. कान्हस, ता. जिंतूर) यांच्या ताब्यातील शेतात हळदीच्या पिकामध्ये लपवून ठेवलेली गांजाची ९ झाडे आढळून आली. तसेच विविध पिशव्यांमध्ये ठेवलेला गांजा पोलिसांनी जप्त केला.
जप्त करण्यात आलेल्या गांजामध्ये पांढऱ्या खताच्या पिशवीतील ५.२०० किलो, हिरव्या खताच्या पिशवीतील ४.८२४ किलो, तर पिवळ्या खताच्या पिशवीतील ६.४३१ किलो गांजाचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण १६.४५५ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे बाजारातील किंमत ८ लाख २२ हजार ७५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी एएसआय नितीन सुधाकर वडकर यांच्या फिर्यादीवरून बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास पोउपनि प्रभोधन जोंधळे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बामणी पोलिस ठाण्याचे सपोनि. मनोज सुरवाडे, एलसीबीचे उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.