Beed News : पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा

किट्टी आडगाव परिसरातील २५ ते ३० गावांचा भार, कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची मागणी
Kitti Adgaon Animal Hospital
Kitti Adgaon Animal Hospitalpudhari photo
Published on: 
Updated on: 

पद्माकर देशमुख

किट्टी आडगाव : किट्टी आडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ मध्ये जनावरांसाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यातच दवाखान्यात नियमित पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहत नसल्याने पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे. जनावरांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत असल्याने पशुपालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) ग्रामस्थांसह पत्रकारांनी किट्टी आडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ येथे अचानक भेट देऊन उपलब्ध सेवा, औषधांचा साठा आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी दवाखान्यातील पशुवैद्यकीय सेवांबाबत विचारणा केली.

Kitti Adgaon Animal Hospital
E-Mojani Maharashtra: ई-मोजणीला नागरिकांचा प्रतिसाद; २,२८८ अर्ज प्रलंबित

किट्टी आडगाव येथील या दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे २५ ते ३० गावांचा समावेश असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पशुधन असून गाय, म्हैस, बैल, शेळी यांसह विविध जनावरांच्या उपचारासाठी शेतकरी या शासकीय दवाखान्यावर अवलंबून आहेत. मात्र, आवश्यक औषधे उपलब्ध नसणे आणि नियमित पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसणे यामुळे पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दवाखान्यात कार्यरत असलेले डॉक्टर शेजुळ नियमितपणे उपलब्ध राहत नाहीत. महिन्यातून एखाद्या वेळी डॉक्टरांची भेट होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. त्यामुळे जनावर आजारी पडल्यास किंवा तातडीच्या उपचाराची गरज भासल्यास पशुपालकांना खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. तपासणी, औषधोपचार आणि इतर खर्चामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे पशुपालकांनी सांगितले.

यावेळी मुरली आगे, दिलीप आगे, अंगद आगे, सखाराम गांजपूरे, कल्याण घाटुळ यांच्यासह गावातील नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते. संबंधित पशुवैद्यकीय विभागाने किट्टी आडगावच्या दवाखान्याकडे तातडीने लक्ष देऊन औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा आणि कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करून पशुपालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Kitti Adgaon Animal Hospital
Beed crime : जिल्हा परिषद शाळेत व्हिडीओ शूटिंग; शिक्षिकेशी गैरवर्तन

लसीकरण व उपचारांवर परिणाम

पशुधनाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित लसीकरण, तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपचार आवश्यक असतात. मात्र, शासकीय दवाखान्यात अधिकारीच नियमित उपलब्ध नसल्यास या सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशुधन हा शेतीसोबतच उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार असल्याने शासकीय पशुवैद्यकीय सेवा सक्षम आणि नियमित असणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.

कायमस्वरूपी अधिकाऱ्याची मागणी

किट्टी आडगाव पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने गावे येत असल्याने येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जनावरांसाठी आवश्यक औषधांचा नियमित व पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, लसीकरण व उपचाराच्या सुविधा सुरळीत कराव्यात आणि पशुपालकांना वेळेत सेवा मिळेल, याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.

शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना असूनही पशुपालकांना उपचारासाठी खासगी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागत असेल, तर यामागील कारणांची संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news