
ताडकळस : ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसोला शिवारात झालेल्या दुचाकी आणि टॅक्टरच्या अपघातात तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि.१०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये एकनाथ बाबाराव धुगे (वय ३७) त्यांची पत्नी शुभांगी एकनाथ धुगे (वय ३४) मुलगा समर्थ एकनाथ धुगे (वय ११, रा.अंजनवाडी, ता. औंढा नागनाथ) हे मृत झाले.
धुगे कुटुंबीय दुचाकीने परभणीतून गावाकडे येत असताना वसमत राज्य मार्गावरील आसोला पाटी येथे एका विना नंबरच्या टॅक्टरने त्यांना धडक दिली. त्यात दुचाकीवरील तिघांचा दुर्दैवी मृत्यु झाला. मयताचा भाऊ नवनाथ बाबाराव धुगे (वय ३९ वर्ष रा. अंजनवाडी) यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे यांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकात नागरगोजे, आप्पाराव वराडे हे करीत आहेत.