

Parbhani Tadkals Cattle Deaths
ताडकळस : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मिरखेल गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेतातून घराकडे येत असताना बैलजोडी, गायी-म्हशी रानडुकरांच्या कळपामुळे घाबरून पाण्याच्या खदानीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. शेतकरी उमेश परसराम देशमुख यांचे अंदाजे तीन ते साडेतीन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिरखेल येथील उमेश देशमुख हे शेतकरी सुमारे साडेतीन एकर क्षेत्रावर शेती करत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर ताण वाढला आहे. उगवलेली पिके सावरण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असताना देशमुख सोमवारी आपल्या शेतीवर बैलजोडी, गाभण म्हैस आणि वासरे गाय घेऊन गेले होते. संध्याकाळी शेतकाम आटपून बैलगाडीतून घराकडे परतताना अचानक रस्त्यावर रानडुकरांचा मोठा कळप समोर आला. त्यामुळे घाबरुन बैल गाडीसह जनावरे रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या खदानीत पडले. या दुर्घटनेत १ लाख १० हजारांची बैलजोडी, गाभण म्हैस आणि वासरे, गाय बुडून मृत्युमुखी पडली.
या दुर्घटनेने उमेश देशमुख यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटनेबाबत वनविभागाकडे ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. देशमुख यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गांतून होत आहे. वन्यप्राण्यांच्या धोक्यामुळे शेतकऱ्यांचे जीव व मालमत्ता धोक्यात येत असून, शासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून तत्काळ मदत जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.