

Husband kills Wife over Milk in Tadkals
ताडकळस: परभणी जिल्ह्यातील ताडकळस परिसरातील बलसा बु गावात किरकोळ कारणावरून घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. दुध सांडल्याच्या रागातून पतीने मारहाण करून पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना सोमवारी (दि. ८) सकाळी घडल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा सुरेश देविदास शिंदे (वय २५, रा. बलसा बु) यांनी ताडकळस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, त्याची आई सुनीताबाई देविदास शिंदे (वय ४५) यांना त्यांच्या पतीने, देविदास माणिकराव शिंदे (वय ५०), याने दुध सांडल्याच्या कारणावरून प्रथम घरात मारहाण केली. त्यानंतर शेत गट क्रमांक ७७ मध्ये नेऊन काठीने बेदम मारहाण केली व अखेरीस दस्तीने गळा आवळून खून केला.
या घटनेनंतर आरोपी पतीविरुद्ध ताडकळस पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे व त्यांचे सहकारी करीत आहेत.