

पूर्णा : तालुक्यातील कात्नेश्वर येथील शेतशिवारात शॉटसर्किटमुळे साडेतीन एकर ऊस फडाला अचानक आग लागली. २८ सप्टेंबर रोजी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे साडेतीन एकर जळून खाक झाले. यात शेतकऱ्याचे सुमारे ५ लाख रुपये आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील शेतकरी वसंत विठ्ठलराव चापके यांची गट क्रमांक ४६६ मध्य बागायती शेती आहे. या जमिनीत त्यांनी मागील रब्बी हंगामात साडेतीन एकर ऊस लागवड केला होता. शेतात शेतकऱ्याने मशागत, लागवड बेणे, रासायनिक खते, पाणी पाळ्या देऊन काबाडकष्टाने ऊस पिकवला होता.
फडातील ऊस परिपक्व होवून येत्या महिनाभरात तोडणी गाळपासाठी सज्ज होता. परंतू, शेतातील विद्युततारांमध्ये दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान शॉटसर्किट झाला. विद्युत तारेतून ज्वालेची ठिणगी उभ्या फडात पडून पाहता पाहता उभा ऊस जळून खाक झाला. यात सबंधित शेतकऱ्याचे सुमारे ५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून महसूल विभागाकडे मदतीची मागणी केली आहे.