

Nikita Avchare Chairperson Padmasinh Deshmukh Deputy Chairperson
सोनपेठ : सोनपेठ पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता श्याम अवचारे, तर उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.
पंचायत समितीच्या कै. माजी आमदार उत्तमराव विटेकर सभागृहात मंगळवारी (दि. १० मार्च) सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पिठासीन अधिकारी तथा सह जिल्हा निबंधक डॉ. रतनसिंह साळोक अध्यक्षस्थानी होते.
गेल्या अनेक वर्षांपासून सोनपेठ पंचायत समितीचा कारभार प्रशासकांकडे होता. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध विकासकामांना अपेक्षित गती मिळत नव्हती. आता नवीन पदाधिकारी निवड झाल्याने विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे उखळी बु. गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता अवचारे या एकमेव उमेदवार निवडून आल्या. तर शेळगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्मसिंह देशमुख यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली.
निवडीची घोषणा होताच परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सोनपेठ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून यंदाही मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करून पक्षाचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले आहे.