

Elderly Man Cheated Parbhani
सोनपेठ : शनिदेवाची साडेसाती कमी करण्याचे आमिष दाखवून हातचलाखीने एका ७५ वर्षीय वृद्धाचा विश्वास संपादन करत त्यांची फसवणूक करण्यात आली. मंत्रविधी करण्याच्या बहाण्याने वृद्धाकडील सोन्या-चांदीच्या अंगठ्या घेत भामट्यांनी ४५ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोनपेठ शहरातील बसस्थानकाच्या गेटजवळ घडली. याप्रकरणी बुधवारी (दि. ७) सोनपेठ पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रामराव चिकणे हे ५ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास आपल्या मुलाच्या दुकानाकडे जात होते. त्यावेळी बसस्थानकाच्या गेटजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले. त्यांनी चिकणे यांच्या मनातील गोष्ट ओळखत असल्याचा दावा केला. तसेच, त्यांच्या मागे शनिदेवाची साडेसाती असून मंत्रसामर्थ्याने ती कमी करता येईल, असे सांगितले. यासाठी विशिष्ट विधी करावा लागेल, असे सांगत त्यांनी चिकणे यांच्याकडून शंभर रुपयांची नोट घेतली.
या नोटेवर धातूची वस्तू ठेवण्यास सांगितल्यानंतर चिकणे यांनी आपली चांदीची अंगठी ठेवली. मात्र, तुमच्याकडे सोन्याची अंगठी असताना चांदीची अंगठी ठेवल्यामुळे शनिदेव नाराज होतील, असे सांगून भामट्यांनी त्यांना सोन्याची अंगठीही ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर दोन्ही अंगठ्या कागदात गुंडाळून ही पुडी चिकणे यांच्या हातात दिली.
काही अंतर पुढे गेल्यानंतर चिकणे यांनी पुडी उघडून पाहिली असता त्यामध्ये सोन्या-चांदीच्या अंगठ्यांऐवजी दगडी खडे असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बसस्थानक परिसरात दोन्ही अनोळखी व्यक्तीचा शोध घेतला; मात्र ते मिळून आले नाहीत.
घडलेला प्रकार मुलाला सांगितल्यानंतर रामराव चिकणे यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन अनोळखी भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.