

Selu Walur road crash
सेलू, : सेलू ते वालूर रस्त्यावर सोमवारी (दि. 20) पाणी फिल्टरजवळ घडलेल्या भीषण अपघातात १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवलेल्या हायवा टिपरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युवकाला जोरदार धडक दिली. यामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, या प्रकरणी टिपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष विष्णु कोरडे (वय १८, रा. राजा, ता. सेलू) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी परमेश्वर मच्छिंद्र शेजुळ (वय ४६, रा. राजा) यांनी सेलू पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी व त्यांचा भाचा सुभाष हे दोघे मोटारसायकल (एम एच 22 एसी 6858) वरून सेलूपासून राजा गावाच्या दिशेने जात होते. दरम्यान, फिर्यादीने पाणी फिल्टरजवळ रस्त्याच्या कडेला मोटारसायकल थांबवली. सुभाष मोटारसायकलजवळ उभा असतानाच, वालूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या हायवा टिपर (एम एच 22 ए एन 5392) ने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत सुभाषच्या डोक्याला, पायाला आणि कंबरेला गंभीर इजा होऊन तो जागीच मृत्यूमुखी पडला.
अपघातामुळे मोटारसायकलचेही अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर टिपर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी टिपर चालक प्रेमलाल सूर्यवली साकेत (रा. कोरौली खुर्द, जि. सिंधी, मध्यप्रदेश; सध्या रा. देवगावफाटा कॅम्प, ता. सेलू) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार शेख उस्मान करीत आहेत.