

जिंतूर : जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलिस ठाणे हद्दीतील सावरगाव तांडा येथे २९ वर्षीय विवाहित महिला जनाबाई मधुकर पवार यांचा मृतदेह (दि.५ जुलै, शनिवारी) सकाळी सावरगाव तांडा शिवारातील विहिरीत आढळून आला. पतीसह सासरच्या मंडळी विरोधात संशय व्यक्त करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठा जमाव जमवला आणि आरोपींना अटक झाल्याशिवाय शवविच्छेदन नको अशी भूमिका घेतली.
चिंचोली काळे येथील जनाबाई यांचा विवाह सावरगाव तांड्याचे मुरलीधर पवार यांच्याशी झाला होता. दांपत्याला एक मुलगा एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत. मृत्यूबाबत संशय व्यक्त करत जनाबाई यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले. “पती व सासरच्या लोकांना अटक होईपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही,” असा पवित्रा त्यांनी घेतला.
पोलिस उपनिरीक्षक सुनील अंधारे, पीएसआय विठ्ठल राठोड यांच्यासह परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार जिया खान पठाण, चौधरी ,वासलवार, मधुकर राठोड,घोगरे, घुगे आदींनी घटनास्थळी पोहोचून नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक आडून बसल्याने सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत रुग्णालयात नातेवाईक ठाण मांडून बसली आहे.