

Ashram School Fire Safety Scam
जिंतूर : जिंतूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आश्रम निवासी शाळेत अग्नीसुरक्षा प्रतिबंधित साहित्य बसवण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून लाखो रुपयाची शासनाची गुत्तेदार यांनी फसवणूक केल्याची तक्रार विविध पुराव्यासह माजी आमदार विजयराव भांबळे यांनी लेखी स्वरुपात मा. मुख्य सचिव, मंत्रालय मुंबई येथे केली आहे.
जिंतूर तालुक्यातील वझर, चारठाणा, कुऱ्हाडी, इटोली, गडद गव्हाण येथील आश्रमशाळेत अग्नीसुरक्षा साहित्य बसवण्याचे काम एका गुत्तेदाराने घेतले असून इस्टीमेट प्रमाणे कोणतेही साहित्य शाळेला दिले नाही, काही शाळामध्ये अर्धवट साहित्य तर काही शाळामध्ये निकृष्ठ दर्जाचे साहित्य देऊन शासनाची दिशाभूल करत लाखो रुपयेचे देयके उचलून घेऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे.
तसेच यात आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळ केला असून बोगस व अर्धवट साहित्याने आग लागल्यास जीवित हानी होऊ शकते. तसेच यात अनेक अधिकारी, कर्मचारी देखील सहभागी असून सदर प्रकारची वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात यावी व संबंधित भ्रष्ट गुत्तेदार यास काळ्या यादीत टाकावे तसेच शासनाचे हडप केलेले पैसे वसूल करण्यात यावे, अशी विजयराव भांबळे यांनी लेखी स्वरुपात पुराव्यासह तक्रार केली आहे.