Parbhani Protest | परभणी तालुक्यात मृत्यूनंतरही अंत्यविधीसाठी जागेचा संघर्ष; स्मशानभूमीसाठी सरण आंदोलन

परभणी तालुक्यात अनेक गावांत हक्काची जागा नाही; इतरांच्या शेतात अंत्यविधी करण्याची वेळ
Crematorium Protest Parbhani
सत्यशोधक युवा संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘सरण आंदोलन’ करण्यात आले.Pudhari
Published on: 
Updated on: 

Crematorium Protest Parbhani

परभणी : मृत व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप देण्यासाठीही हक्काची जागा उपलब्ध नसल्याने अनुसूचित जाती-जमाती तसेच भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना अनेक गावांत संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप करत सत्यशोधक युवा संघाच्या वतीने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘सरण आंदोलन’ करण्यात आले. ‘गाव तिथे स्मशानभूमी’ आणि ‘एक गाव, एक स्मशानभूमी’ या मागण्यांसाठी संघाने प्रशासनाकडे तातडीने कार्यवाहीची मागणी केली.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये संबंधित समाजातील नागरिकांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधीच्या वेळी गंभीर अडचणी निर्माण होत असल्याचे संघाने निवेदनात म्हटले आहे. काही ठिकाणी स्मशानभूमीच्या जागेवरून वाद आहेत, तर काही गावांमध्ये इतरांच्या शेतात अथवा उपलब्ध मोकळ्या जागेत अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची मोठी गैरसोय होत असून, हा मूलभूत प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने सोडवावा, अशी मागणी करण्यात आली.

Crematorium Protest Parbhani
Parbhani news : कमलापुरात वाळलेल्या सोयाबीनची शेतकऱ्याने वैतागून केली होळी

परभणी तालुक्यातील साडेगाव, तरोडा, नर्सापूर, पूर्णा तालुक्यातील खुजडा तसेच परभणी शहरालगतच्या सोनगा आदी गावांमध्ये स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न असल्याचे संघाने सांगितले. ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही, तेथे शासनाने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच जागा उपलब्ध असूनही विकासकामांच्या अभावामुळे अंत्यविधी करता येत नसलेल्या ठिकाणी पक्का रस्ता, अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा आणि अन्य मूलभूत सोयी तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

स्मशानभूमीच्या जागेवरून वाद असलेल्या गावांमध्ये प्रशासनाने समिती स्थापन करून प्रत्यक्ष पाहणी करावी आणि वादावर योग्य तोडगा काढावा, अशीही मागणी संघाने केली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधिमंडळात केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत या प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Crematorium Protest Parbhani
Parbhani News : जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बांधावर जाऊन केली पीक पाहणी

खळीतील महिलेचा अंत्यविधी गंगाखेडमध्ये

गंगाखेड तालुक्यातील खळी गावातील एका महिलेचे नुकतेच निधन झाले. मात्र, गावात अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने तिचा अंत्यविधी गंगाखेड शहरात करावा लागल्याचे संघाने निवेदनात नमूद केले. पूर्णा तालुक्यातील बरबडी येथेही स्मशानभूमीच्या जागेवरून वाद सुरू असल्याचा दावा करण्यात आला.

मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास स्मशानभूमीच्या प्रश्नावर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघाने दिला. आंदोलनात लखन चव्हाण यांच्यासह सुनिता पंडित, दिलीप बडवणे, रवी धोत्रे, करण बडवणे, विकास माने, रमेश कदम, शिवाजी नेटके, विकास वाकोडे, अनिल कदम, कैलास हकारे, आत्माराम हाकारे, विठ्ठल हंकारे, रामभाऊ आगलावे, अनिल शिंदे, अरुण नेटके, विनोदराव आगलावे, ज्योती कांबळे, सुगंधा फाले, वंदना कांबळे, वैजंता आवटे, शोभा साबळे, द्रोपदाबाई कांबळे, यशोदा साळवे, रामदास चव्हाण, प्रवीती चव्हाण यांच्यासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news