

बोरी, पुढारी वृत्तसेवा: पावसाने दीर्घकाळ दांडी मारल्याने बोरीसह परिसरातील सोयाबीन व कापूस पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पावसाअभावी वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, झालेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न याबाबत माहिती जाणून घेतली.
बोरी येथील शेतकरी वैजनाथ चौधरी यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सोयाबीन पिकात शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत पावसाने उघडीप दिल्याने शेंगा गळून पडल्या असून, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. पावसाअभावी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे चित्र पाहणीदरम्यान दिसून आले.
पीक पाहणी करताना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. "सोयाबीनची पेरणी करण्यापासून आतापर्यंत किती खर्च झाला? पावसाअभावी पीक खराब झाल्यानंतर किती उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे? सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल किती भाव मिळत आहे?" असे प्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना विचारले. शेतकऱ्यांनीही आपल्या अडचणी आणि पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः बांधावर आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा निर्माण झाली आहे. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी, शैलेश लाहोटीजिंतूर तहसीलदार शितल कच्छवे, नायब तहसीलदार राखे, मंडळ अधिकारी पडगुजर, नंदकुमार सोनवणे, तलाठी विठ्ठल नागरगोजे रोहन पवार, शंकर गोरे, कोतवाल मयूर टाक, यांच्या समवेत सपोनी अभिजीत आडके पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड व राजकीय पदाधिकारी, पत्रकार, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पीक पाहाणी व वीमा प्रयोगाबाबत निर्देश
पिकांच्या नुकसानीचे योग्य प्रकारे मूल्यमापन होण्यासाठी पीक पाहणी व पीक कापणी प्रयोग नियमानुसार होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीनुसार योग्य मदत मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणांनी शासनाच्या नियमांनुसार कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
पीक विमा कंपनीकडून पीक पाहणी करताना जमिनीवरील प्रत्यक्ष पाहणी तसेच सॅटेलाइटच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार न्याय मिळावा, यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी यावेळी दिले.